Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज.
ठाणे जिल्हा शिवसेनेच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उदंड प्रतिसादात कार्यकर्ता मेळावा पार पडला.
शिवसेनेचा ठाण्याचा गड अभेद्य ठेवण्यासाठी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
ठाणे : प्रतिनिधी.
ठाणे जिल्हा शिवसेनेच्या वतीने कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कार्यकर्त्यांना संबोधित करताना शिवसेनेचा ठाण्याचा गड अभेद्य ठेवण्यासाठी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
ठाणे हे वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा विचारांनी चालणारे शहर आहे. वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आत्मसात करूनच आपण आजवर हा किल्ला अभेद्य ठेवला असून यापुढेही तो अभेद्यघ राहील असे यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. त्यांच्याच आशीर्वादाने सर्वसामान्य ठाणेकर शिवसैनिक आज मुख्यमंत्रीपदावर बसला असून, सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी आपण सारे कटिबद्ध असल्याचे सांगितले.
राज्यात महायुतीचे सरकार अस्तित्वात आले असून अजित पवार यांची राष्ट्रवादी देखील विकासाच्या मुद्यावर आपल्यासोबत सत्तेत सामील झाली आहे. मात्र आपल्या सरकारने आजवर घेतलेले प्रत्येक निर्णय सर्वसामान्य माणसाला न्याय आणि हक्क मिळवून देण्यासाठी घेतला असून त्या दिशेने सरकारची वाटचाल सुरू असल्याचे यावेळी बोलताना स्पष्ट केले. माणूस हा जन्माने नव्हे तर कर्माने मोठा होतो जेव्हा सत्ता नसेल तेव्हाही लोकांनी आपल्याशी सन्मानाने वागायला हवे असे वर्तन आपण ठेवावे अशी अपेक्षा यावेळी एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.
ज्या मतदारांच्या मतावर आपण निवडून आलो त्यांना दगा देऊन गद्दारी कुणी केली ते आपण जाणतो, मात्र आम्ही कधीही पातळी सोडून टीका केली नाही आणि करणार नाही असे निक्षून सांगितले. आज गावोगावी फिरतो तेव्हा लोकांच्या चेहऱ्यावरील आनंद आम्हाला सांगतो की आम्ही केलं ते चूक नाही तर बरोबरच आहे. देवेंद्र फडणवीस यांना कलंक म्हणता, पण त्याच देवेंद्र फडणवीस यांनी 2017 साली मुंबई महापालिकेत भाजपा सहज महापौर बसवू शकत असतानाही तुमच्या सांगण्यावरून मुंबई महापालिकेतली सत्ता सोडली. त्यांना तुम्ही काय वागणूक दिलीत..? 'शासन आपल्या दारी'वर टीका करता पण लोकांनी हे अभियान डोक्यावर घेतले असून लाखो लोकांना या उपक्रमाच्या माध्यमातून प्रत्यक्ष लाभ मिळाला आहे. कायम घरी बसलेल्यांना ‘शासन आपल्या दारी’चे महत्व कळणार कसे..? आम्ही लोकांसाठी शिलाई मशीन घेतो, नोटा मोजायचे मशीन घेत नाही असे सांगतानाच, आम्ही देणारे आहोत, घेणारे नाही असे मत व्यक्त करत विरोधकांचा यथेच्छ समाचार घेतला.
याआधीच्या अडीच वर्षात लोकहिताचे अनेक प्रकल्प फक्त वैयक्तिक इगोपायी रखडवले, मेट्रोच्या प्रकल्पाची किंमत 10 हजार कोटींनी वाढली, लोकांचे पैसे विनाकारण वाया गेले. राज्यकर्त्यांने वैयक्तिक हेवेदावे बाजूला ठेवून लोकहिताला प्राधान्य द्यायचे असते पण स्वतःच्या अहंकारापुढे ते देखील करणे जमले नाही. आज राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसेनेमध्ये अनेक लोकं स्वतःहून सहभागी होत आहेत. हा प्रवाह कमी होत नाही उलट दिवसेंदिवस वाढत चालला आहे. "ये कारवा बढता ही जायेगा, रोक सको तो रोक लो" असे जाहीर आव्हान शिंदे यांनी विरोधकांना दिले..
राज्यातील सरकार स्थिर असून आता 200 आमदारांचा आपल्याला पाठिंबा आहे, त्यामुळे लोकसभा निवडणुकीत 45 हुन अधिक आणि विधानसभा निवडणुकीत 200 पेक्षा जास्त जागा निवडून आणण्याचे उद्दिष्ट आपण डोळ्यासमोर ठेवले असून त्यासाठी साऱ्यांनी सज्ज व्हावे असे आवाहन कार्यकर्त्यांशी संवाद साधताना केले.
याच कार्यक्रमात मुंबई महानगरपालिकेचे काँग्रेसच्या माजी नगरसेविका सौ.सुप्रिया मोरे आणि त्यांचे पती सुनील मोरे यांनी आपल्या कार्यकर्त्यासह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
याप्रसंगी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार भरतशेठ गोगावले, आमदार प्रताप सरनाईक, आमदार मनिषा कायंदे, आमदार डॉ. बालाजी किणीकर, आमदार शांताराम मोरे, ठाणे ग्रामीण जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, ठाणे जिल्हाप्रमुख, महाराष्ट्र राज्य समन्वयक व प्रवक्ते नरेश म्हस्के, नवी मुंबई मनपाचे माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, माजी आमदार शिशिर शिंदे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख सौ. मिनाक्षी शिंदे, शिवसेना प्रवक्त्या सौ. शीतल म्हात्रे, प्रवक्ते राहुल लोंढे आणि शिवसेनेचे ठाणे जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रिपोर्टर