Breaking News
२०२५ सालापर्यंत क्षयरोगाचे निर्मूलन करण्याचे महापालिकेचे उद्दीष्ट
- महानगरपालिका आरोग्य प्रशासनाची खासगी क्षेत्रासोबत भागीदारी
मुंबई : लोकवार्ता टाइम्स
कोविड- १९ विषाणू संसर्ग नियंत्रण करताना बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांमध्ये खासगी- सार्वजनिक सहभागातून करण्यात आलेली कामगिरी देखील महत्वाची ठरली. हे लक्षात घेता, सन २०२५ पर्यंत मुंबईतून क्षयरोग निर्मूलन करण्यासाठी खासगी क्षेत्रातील रूग्णालयांसमवेत भागीदारी करण्याचा निर्णय महानगरपालिका आरोग्य प्रशासनाने घेतला आहे, अशी माहिती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांनी दिली.
कोविड- १९ संसर्ग कालावधीत मुंबईतील नागरिकांना मुंबई महानगरपालिकेने खासगी क्षेत्रातील व्यावसायिकांच्या मदतीने विविध आरोग्य सुविधा पुरविल्या. कोविड रूग्णांना उपचार, विलगीकरण यासोबत सध्या सुरु असलेली कोविड १९ लसीकरण मोहीम या सर्वांमध्ये खासगी क्षेत्राबरोबर महानगरपालिका प्रशासनाने भागीदारी यशस्वी करुन दाखविली. हा अनुभव पाहता महानगरपालिकेने सन २०२५ पर्यंत क्षयरोग निर्मुलनाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी खासगी रुग्णालयांना सोबत घेण्याचे ठरविले आहे. त्या दृष्टीने अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच दूरदृश्य प्रणालीद्वारे खासगी क्षेत्रातील भागीदारांसोबत बैठक घेतली.
कोविड नियंत्रण व्यवस्थापनामध्ये जी ४३ खासगी रूग्णालये महानगरपालिका प्रशासनासमवेत कार्यरत होती, त्यांना क्षयरोग निर्मूलन- २०२५ करीता सहभागी होण्याकरीता निमंत्रित करण्यात आले होते. या बैठकीत अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांनी माहिती देताना सांगितले की, मुंबईतील ५० टक्के क्षयरोग रुग्ण संख्या खासगी क्षेत्रातून येत असल्याकारणाने खासगी क्षेत्राने क्षयरोग निर्मूलन करण्यामध्ये आपापल्या क्षमतेप्रमाणे पुढाकार घेणे महत्त्वाचे आहे. कोविड काळातील भागीदारीचा अनुभव लक्षात घेऊन महानगरपालिका आणि खासगी क्षेत्राने क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमात योगदान देण्याचे आवाहन काकाणी यांनी यावेळी केले. राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम अंतर्गत कार्यरत असलेली रूग्णालये, अशासकीय संस्था, खासगी औषध प्रतिरोधी क्षयरोग उपचार केंद्रांद्वारे खासगी क्षयरूग्णांना सुविधा पुरविल्याबाबत काकाणी यांनी अभिनंदनही केले.
बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य खात्याच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमामधील खासगी रूग्णालये यांना सहभागी होण्याकरीता उपलब्ध असलेल्या उपक्रमाची माहिती या बैठकीत दिली. हिंदुजा रूग्णालय, युनिसन मेडीकेअर, डॉक्टर्स फॉर यू, के.जे.सोमय्या रूग्णालय, सर्वोदय रूग्णालय या रुग्णालयांमध्ये औषध प्रतिरोधी क्षयरोग उपचार केंद्र उपक्रम राबविण्यात येत आहेत. या खासगी रुग्णालयांचेही डॉ. गोमारे यांनी अभिनंदन केले.
मुंबई शहर क्षयरोग अधिकारी डॉ. प्रणीता टिपरे यांनी राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम अंतर्गत क्षयरोग दूरीकरण ध्येय गाठण्याकरीता खासगी रूग्णालयांच्या सहभागाने राबविण्यात येणा-या उपक्रमांबाबत तसेच खासगी रूग्णालयांकडून अपेक्षित योगदानाबाबत आणि त्यांना महानगरपालिकेकडून देण्यात येणा-या सुविधांबद्दल माहिती दिली. त्या म्हणाल्या की, राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमा अंतर्गत उपलब्ध उपक्रमांमध्ये सहभाग घेतल्याने रूग्णांकरीता दोन नवीन औषधे उपलब्ध होतील. सदर उपक्रमांमध्ये सहभागी होण्याकरीता रूग्णालयांनी करार केल्यास विकेंद्रीकरण करण्याबाबत मदत होईल व क्षयरूग्णांना घराजवळ उपचार सुविधा उपलब्ध होतील, अशी माहितीही त्यांनी दिली. खासगी क्षेत्राबरोबर भागीदारी बाबतच्या सत्रानंतर बेस्ट परिवहन आणि विद्युत पुरवठा विभाग मुंबईचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. सिंघल यांनी बेस्टच्या डायमंड लेव्हल कॉर्पारेट सभासद पदाबाबत अनुभव कथन केला.
रिपोर्टर