Breaking News
मुंबई महानगरपालिका क्षेत्रात कोविड चाचण्यांचा एक कोटीचा टप्पा पार
- महानगरपालिका क्षेत्रात सातत्याने कोविड विषयक वैद्यकीय चाचण्या
मुंबई : लोकवार्ता टाइम्स
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात मार्च २०२० पासून करण्यात येत असलेल्या या वैद्यकीय चाचण्यांनी नुकताच एक कोटींचा टप्पा पार केला आहे. यानुसार २१ सप्टेंबर २०२१ पर्यंत बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात एकूण १ कोटी ५९ हजार २५४ चाचण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे.
कोविड - १९' या साथरोगाच्या प्रसारास आळा घालण्याच्या विविध स्तरीय उपाययोजनांचा एक प्रमुख भाग आहे तो म्हणजे कोविड विषयक वैद्यकीय चाचण्या. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनानुसार कोविड विषयक वैद्यकीय चाचण्या करण्याची कार्यवाही आणि व्यवस्थापन सातत्याने अधिकारी प्रभावीपणे करण्यात येत आहे.
कोविड - १९ या साथ रोगाचा पहिला रुग्ण बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात मार्च २०२० मध्ये आढळून आला. तेव्हापासून आजतागायत बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे विविधस्तरीय प्रतिबंधात्मक उपाययोजना सातत्याने राबविण्यात येत आहेत. याच उपाययोजनांमध्ये कोविड विषयक वैद्यकीय चाचण्यांचा प्रामुख्याने समावेश आहे. याचे कारण म्हणजे कोविड या संसर्गजन्य रोगाची बाधा झाल्याचे निदान जेवढ्या लवकर होईल, तेवढ्याच लवकर संबंधित व्यक्तीचे विलगीकरण करता येते. ज्यामुळे सदर बाधित व्यक्तीपासून इतरांना बाधा होण्यास प्रतिबंध होतो. हीच बाब प्रामुख्याने लक्षात घेऊन कोविड विषयक चाचणी करून घेण्याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिका सातत्याने जनजागृती करीत आहे आणि नियमितपणे चाचण्या देखील करीत आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये, दवाखान्यांमध्ये आणि निर्धारित केंद्रांमध्ये या चाचण्या मोफत करण्यात येत आहेत.
सध्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीतील २६० पेक्षा अधिक चाचणी केंद्रे (नमुना संकलन केंद्रे) विविध ठिकाणी कार्यरत आहेत. त्याच बरोबर मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील इतर खासगी वैद्यकीय प्रयोगशाळा मध्ये देखील या चाचण्या करण्यात येत आहेत. या सर्व चाचण्यांचे निकाल हे चाचणीचा निकाल आल्यापासून २४ तासांच्या आत केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर 'अपलोड' करणे गरजेचे आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीतील २६० चाचणी केंद्रांवर कोविड विषयक वैद्यकीय चाचणी मोफत करण्यात येते. या केंद्रांचे पत्ते महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. त्याचबरोबर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व २४ विभागांमध्ये कार्यरत असणाऱ्या नियंत्रण कक्षांशी (Ward War Room) संपर्क साधल्यानंतर देखील आपल्या नजीकच्या चाचणी केंद्राचा पत्ता मिळू शकतो.
कोविड विषयक वैद्यकीय चाचण्या या कोविड प्रतिबंधात्मक उपाय योजनांचा महत्त्वाचा भाग असल्यामुळे कोविडची लक्षणे आढळून आलेल्या व्यक्तींनी किंवा बाधित व्यक्तीच्या निकटच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी तातडीने आपली कोविड चाचणी करवून घ्यावी. तसेच गणेशोत्सवासाठी बाहेरगावी जाऊन परतलेल्या किंवा अन्य कारणांसाठी बाहेरगावी जाऊन परत आलेल्या व्यक्तींनी आपली कोविड विषयक वैद्यकीय चाचणी करवून घ्यावी. ज्यामुळे वेळीच निदान झाल्यामुळे वेळच्या वेळी औषध उपचार मिळण्यासह संबंधित व्यक्तीला विलगीकरणात ठेवल्यामुळे त्या व्यक्ती पासून इतरांना संसर्ग होण्याची शक्यता कमी होईल. तरी या अनुषंगाने कोविड विषयक वैद्यकीय चाचणी वेळच्या वेळी करवून घेण्याचे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाद्वारे पुन्हा एकदा करण्यात आले आहे.
रिपोर्टर