Breaking News
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्यावतीने प्रशिक्षण
मुंबई : लोकवार्ता टाइम्स टीम
काही दिवसांमध्ये सुरू होणा-या गणेशोत्सवाची लगबग सध्या सर्वत्र सुरू आहे. या गणेशोत्सव काळात काय खबरदारी घ्यावी अथवा एखादी आपत्ती उद्भवल्यास त्याचे निराकरण कसे करायचे याबाबत मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, स्वयंसेवक यांना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्यावतीने प्रशिक्षण देण्यात आले.
यंदाच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहिबावकर यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनास याप्रकारचे प्रशिक्षण देण्याविषयी विनंती केली होती. त्यास अनुसरुन हा उपक्रम ४ आणि ५ सप्टेंबर २०२१ अशा दोन दिवशी राबविण्यात आला. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिका-यांना या प्रशिक्षणात भाग घेता यावा यासाठी, शहर विभागातील मंडळांना परळमधील शहर आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण केंद्रात तर पूर्व उपनगरातील मंडळांना घाटकोपर भटवाडी महानगरपालिका शाळा येथे आणि पश्चिम उपनगरातील मंडळांकरिता जोगेश्वरी (पूर्व) मधील नटवरनगर महानगरपालिका शाळेत प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. कोविड-१९ विषाणू संसर्ग प्रतिबंधक निर्देशांचे पालन करुन ही कार्यशाळा संपन्न झाली. तिन्ही ठिकाणी प्रत्येकी ५० याप्रमाणे एकूण १५० पदाधिकारी व स्वयंसेवक यांना हे आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण देण्यात आले.
कोणत्याही प्रकारची आपत्ती उद्भवल्यास, त्या आपत्तीचे त्वरित निराकरण करता यावे, हा या प्रशिक्षणाचा मूळ उद्देश आहे. आपत्ती म्हणजे नेमके काय, धोके कसे ओळखावेत, आपत्कालीन परिस्थितीत काय करावे आणि काय करु नये, आग लागल्यास त्वरित करावयाच्या उपाययोजना, अग्निशमकांचा वापर, प्रथमोपचार, जखमींना वाहून नेण्याच्या पद्धती याबाबतचे सखोल प्रशिक्षण या कार्यशाळेमध्ये देण्यात आले.
आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे), सुरेश काकाणी यांच्या निर्देशानुसार हा उपक्रम राबविण्यात आला. उपायुक्त (आपत्कालीन व्यवस्थापन) प्रभात रहांगदळे, संचालक (आपत्कालीन व्यवस्थापन) महेश नार्वेकर, प्रमुख अधिकारी (आपत्कालीन व्यवस्थापन) संगीता लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या उपक्रमात प्रशिक्षण देण्यासाठी आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे सत्रप्रमुख राजेंद्र लोखंडे, प्रवीण ब्रम्हदंडे, महेंद खंबाळेकर तसेच अग्निशमन दलाचे अधिकारी आणि १०८ आणीबाणी रुग्णसहाय्य सेवेचे अधिकारी उपस्थित होते.
रिपोर्टर