Breaking News
मुंबईचे टेंशन वाढले
- आणखी तीन ओमायक्रॉन विषाणूचे रूग्ण सापडले
- एकूण रुग्ण संख्या पाच
मुंबई : लोकवार्ता टाइम्स
बृहन्मुंबई महानगर पालिका क्षेत्रात आणखी तीन रुग्णांना ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग झाल्याचे निदान झाल्याने मुंबईकरांचे टेन्शन वाढले आहे. काही दिवसांपूर्वीच दोन रूग्ण सापडल्याने आता मुंबई क्षेत्रात एकूण पाच रुग्णसंख्या झाली आहे. या रुग्णांना गंभीर लक्षणे नाहीत, तथापि खबरदारीची उपाययोजना म्हणून संबंधित रुग्ण महापालिकेच्या रुग्णालयात विलगीकरणात दाखल करण्यात आले आहे. आज १० डिसेंबर २०२१ रोजी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडून जनुकीय नमुन्यामध्ये निदान झालेले ओमायक्रॉन विषाणू बाधित तीन रुग्णांचा हा अहवाल प्राप्त झाला आहे.
पहिला रूग्ण हा ४८ वर्षीय पुरुष असून टांझानिया येथून ०४ डिसेंबर २०२१ रोजी आला होता. ०४ डिसेंबर २०२१ रोजी त्याची चाचणी करण्यात आली. त्यामध्ये सदर व्यक्ती बाधित असल्याचे निदर्शनास आल्याने सदर नमुना जनुकीय विश्लेषणासाठी पाठविण्यात आला होता. सदर रुग्णाचे कोविड लसीकरण शिल्लक आहे. सदर रुग्णाला खबरदारीची उपाययोजना म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याला सौम्य लक्षणे आहेत. सदर रुग्णाच्या अतिजोखमीच्या संपर्कातील दोन सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यापैकी कोणीही कोविड बाधित नाही.
दुसरा रूग्ण हा २५ वर्षीय पुरुष लंडन येथून ०१ डिसेंबर २०२१ रोजी भारतात आला. त्याची कोविड चाचणी बाधीत आल्याने त्याचा वैद्यकीय नमुना जनुकीय विश्लेषणासाठी पाठविण्यात आला होता. सदर रुग्णाचे कोविड लसीचे दोन्हीही मात्रा पूर्ण झाल्या आहेत. सदर रुग्णाला खबरदारीची उपाययोजना म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याला कोणतीही लक्षणे नाहीत. सदर रुग्णाच्या निकटच्या संपर्कातील व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यापैकी कोणीही कोविड बाधित नाही.
तिसरा ३७ वर्षीय पुरुष (गुजरातचा रहिवासी) दक्षिण आफ्रिका येथून ०४ डिसेंबर २०२१ रोजी आला होता. ज्याची कोविड चाचणी केली असता रुग्णास कोविडची बाधा झाल्याचे निदर्शनास आल्याने सदर नमुना जनुकीय विश्लेषणासाठी पाठविण्यात आला होता. सदर रुग्णाच्या कोविड लशीच्या दोन्हीही मात्रा पूर्ण झाल्या आहेत. सदर रुग्णाला खबरदारीची उपाययोजना म्हणून विमानतळावरूनच रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याला सौम्य लक्षणे आहेत.
वरील तपशिलानुसार तिन्ही रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांच्याही कोविड चाचण्या करण्यात आल्या असून त्यापैकी कोणीलाही कोविड बाधा झालेली नसल्याचे वैद्यकीय चाचणी अंती निदर्शनास आले आहे. आज अहवाल प्राप्त झालेल्या तीन रुग्णांमुळे कोविड विषाणूच्या ओमायक्राॅन प्रकाराने बाधित झालेल्या रुग्णांची एकूण संख्या आता पाच झाली आहे.
विषाणूमध्ये बदल होणे ही नैसर्गिक प्रक्रिया असून या बाबत जनतेने भीती न बाळगता आपल्या नेहमीच्या व्यवहारात कोविड अनुरूप वर्तनाचा अंगीकार करावा. नागरिकांनी आपले लसीकरण पूर्ण करावे आणि मागील महिन्याभरात जे प्रवासी आंतरराष्ट्रीय प्रवास करून भारतात आले आहेत त्यांनीही आपल्या बाबत स्थानिक आरोग्य विभागास अवगत करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने सर्व जनतेला करण्यात आले आहे.
रिपोर्टर