Breaking News
रस्त्यांवरील अपघात टाळण्यासाठी दुभाजकांच्या रंगरंगोटीच्या कामांना सुरूवात
- रस्त्यांच्या बाजूंच्या भिंतीवरही कलात्मक चित्रं रंगवून सुशोभीकरण
मुंबई : लोकवार्ता टाइम्स
मुंबई महानगरातील रस्त्यांवरील मध्यवर्ती दुभाजकांच्या रंगरंगोटीची कामे सर्व विभाग कार्यालयामार्फत वेगाने सुरु करण्यात आली आहेत. रस्ते सुरक्षितता वाढविण्यासाठी दुभाजकांसह पदपथांच्या कडेला असणारे दगड देखील रंगवण्यात येत आहेत. त्यासोबत प्रमुख रस्त्यांच्या आजुबाजूला असणाऱ्या भिंतीवरही कलात्मक चित्रं रंगवून सुशोभीकरण करण्यात येत आहे.
रस्त्यांवरील दृश्यमानता वाढावी, पर्यायाने वाहनचालकांना सुरक्षित रितीने वाहन चालविता यावे आणि अपघातांचे प्रमाण कमी व्हावे, रस्ते परिसरांचे सुशोभीकरण व्हावे या दृष्टिने वेगवेगळ्या उपाययोजना करण्याचे निर्देश राज्याचे पर्यटन, पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी एका बैठकीवेळी दिले होते. त्यानुसार महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी सर्व प्रशासकीय विभाग कार्यालयांना सूचना केल्या. ज्या रस्त्यांवर मध्यवर्ती दुभाजक आहेत त्यांची स्वच्छता करुन नव्याने रंगरंगोटी करणे, दुभाजक अस्तित्वात नसल्यास शक्य त्या रस्त्यांवर दुभाजक बांधणे, दुभाजकांमध्ये हिरवळ वा फुलझाडांची लागवड करणे, वाहतूक बेटांचे सुशोभीकरण करणे, प्रमुख रस्त्यांवरील आजुबाजूच्या भिंतीवर कलात्मक रंगरंगोटी करणे, चित्रं रेखाटणे इत्यादी कामे हाती घेण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार सध्या महानगरात विविध भागांमध्ये ही कामे वेगाने सुरु आहेत. विभाग कार्यालयांच्यावतीने ही कामे हाती घेण्यात आली आहेत.
मुंबई महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयांमार्फत प्रमुख रस्त्यांच्या आजुबाजूला असणाऱ्या भिंतीची कलात्मक रितीने रंगरंगोटी करण्यात येत आहे. रस्त्यांवरील पदपथ आणि वाहतूक बेटांचे सुशोभीकरणाची कामे हाती घेण्यात आलेली आहेत. प्रमुख रस्त्यांवरील मध्यवर्ती दुभाजक (डिव्हायडर) आणि पदथाच्याकडेला असणारे दगड (कर्ब स्टोन) सुद्धा रंगवण्यात येत आहेत. ही सर्व कामे नियमित स्वरुपाची आहेत. आवश्यक त्याजागी, आवश्यक त्या वेळी ही कामे केली जातात. असे असले तरी सध्या संपूर्ण मुंबईत एकाचवेळी मोठ्या स्तरावर ही कामे होत आहेत.
या कामांचा मुख्य उद्देश हा सुशोभीकरणासोबतच रस्त्यावरील सुरक्षितता वाढविणे आहे. रंगरंगोटीमुळे दृश्यमानता वाढून वाहनचालकांना सुरक्षितरित्या वाहने चालविण्यास मदत होईल आणि अपघातांचे प्रमाण कमी होईल. तसेच नागरिकांनाही पदपथांवरून सुरक्षितपणे चालता येईल.
रिपोर्टर