Breaking News
१७ सप्टेंबरला फक्त महिलांसाठी राखीव कोविड- १९ लसीकरण सत्र
- सकाळी १०.३० ते सायंकाळी ६.३० पर्यंत होणार लसीकरण
मुंबई : लोकवार्ता टाइम्स
मुंबई महानगरपालिकेच्यावतीने १७ सप्टेंबर २०२१ रोजी फक्त महिलांसाठी कोविड- १९ प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे. शुक्रवारी सकाळी साडेदहा ते सायंकाळी साडेसहा या वेळेत मुंबईतील सर्व शासकीय आणि महानगरपालिकेच्या कोविड- १९ लसीकरण केंद्रांवर हे विशेष सत्र राबवण्यात येणार आहे. यामध्ये महिलांना थेट लसीकरण केंद्रावर येऊन कोविड लसीची पहिली किंवा दुसरी मात्रा देखील घेता येणार आहे. या विशेष सत्राच्या कारणाने उद्यासाठीची ऑनलाइन पूर्व नोंदणी बंद ठेवण्यात येणार आहे.
मुंबईतील सर्व २२७ निर्वाचन प्रभागांमधील लसीकरण केंद्र आणि त्यासोबत सर्व शासकीय व महानगरपालिका रुग्णालये आणि कोविड सेंटर येथील लसीकरण केंद्रावर थेट येवून (वॉक इन) महिलांना कोविड लस घेता येणार आहे. पहिली किंवा दुसरी मात्रा देखील ह्या सत्रात दिली जाणार आहे. फक्त महिलांना लस दिली जाणार असल्या कारणाने, उद्या साठीची प्रचलित ऑनलाइन पूर्व नोंदणी बंद ठेवण्यात आली आहे.
कोविड-१९ विषाणू प्रतिबंधक लसीकरण अधिकाधिक वेगाने आणि सर्व स्तरातील नागरिकांपर्यंत नेण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका देखील प्रयत्नशील आहे. त्यासाठी विशेष सत्र राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून फक्त महिलांसाठी राखीव असे विशेष कोविड लसीकरण सत्र उद्या शुक्रवार दिनांक १७ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी १०.३० ते सायंकाळी ६.३० ह्या वेळेत राबवले जाणार आहे.
रिपोर्टर