Breaking News
मुंबईतील पहिली ते आठवीच्या शाळा ३१ जानेवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय
मुंबई : लोकवार्ता टाइम्स
वाढत्या कोरोना रुग्णांमध्ये मुंबईतील शाळांबाबत अखेर निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईतील पहिली ते आठवीच्या शाळा येत्या 31 जानेवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णवाढ होत आहे. रुग्णवाढ असताना मुलांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे मुंबई महानगरपालिकेच्यावतीने सांगण्यात आले. पहिली ते आठवीच्या शाळा नुकत्याच सुरु झाल्या होत्या. मात्र पुन्हा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता महापालिका आयुक्त इकबाल चहल यांनी शाळांबाबत अखेर निर्णय घेतला आहे. ऑफलाईन शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन शाळा या सुरु राहणार आहेत. मात्र शाळांचे ऑफलाईन वर्ग बंद राहणार आहेत.
राज्यातील शाळांबाबतच्या निर्णयाकडेही विद्यार्थी, पालकांचे लक्ष
आजच शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आजच किशोरवयीन मुलांच्या लसीकरणाचाही आढावा घेतला होता. आजपासून लहान मुलांचं लसीकरण सुरु करण्यात आलं आहे. एकीकडे आता मुंबईत शाळांबाबत जो निर्णय घेण्यात आला आहे, तशाप्रकारचा निर्णय राज्यातील इतरही जिल्ह्यांतील शाळांबाबत घेतला जातो का, याकडे राज्यातील विद्यार्थी आणि पालकांचं लक्ष लागलंय.
रविवारी विक्रमी रुग्णवाढ
रविवारी मुंबईमध्ये तब्बल ८ हजार ६३ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस मुंबईवरील कोरोनचे संकट अधिकच गडद होत चालले आहे. शनिवारीही मुंबईत ६ हजार ३४७ रुग्ण आढळून आले होते, गेल्या काही दिवसात थोडा दिलासा मिळाला होता, मात्र आता पुन्हा आकडेवारी वाढल्याने धाकधूक वाढली आहे. यादरम्यानच एक दिलासादायक बाब म्हणजे रविवारी एकाही कोरोनाबाधिताचा मुंबईत मृत्यू झाला नव्हता. कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर आता महाराष्ट्रात तिसऱ्या लाटेचे ढग गडत होत आहेत. रोज रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे चिंता वाढत आहे. तर दुसरीकडे कोरोनाचे नवे रुप म्हणजेच ओमिक्रॉनबाधित रुग्णदेखील वाढत असल्याचे समोर आले आहे.
रिपोर्टर