Breaking News
कोविड प्रतिबंधात्मक उपाय योजनांच्या अंमलबजावणीसाठी महापालिका आयुक्तांचे आदेश
- महापालिकेच्या मुख्यालयात कोविड विषयक आढावा बैठक संपन्न
मुंबई : लोकवार्ता टाइम्स
कोविड बाधितांच्या संख्येत वाढ झाल्याच्या पाश्वभूमीवर मुंबई महापालिका आयुक्तांच्या मार्गदर्शनात एका विशेष आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महानगरपालिका आयुक्त डाॅ. इकबाल सिंह चहल यांनी कोविड प्रतिबंधात्मक उपाय योजनांची अधिक काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले.
गेल्या काही दिवसात बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात कोविड बाधितांच्या संख्येत वाढ निदर्शनास येत आहे. या पार्श्वभूमीवर महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांच्या निर्देशानुसार आज सोमवारी एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला मार्गदर्शन करताना महापालिका आयुक्तांनी कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी ही कठोरपणे करण्याचे आदेश सर्व संबंधितांना दिले.
महानगरपालिका मुख्यालयात आयोजित या बैठकीला अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी, सह आयुक्त (शिक्षण) अजीतकुमार कुंभार, सह आयुक्त (आयुक्त कार्यालय) चंद्रशेखर चोरे, उपायुक्त रमाकांत बिरादार व संजय कुऱ्हाडे, अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांच्यासह संबंधीत सह आयुक्त/ उप आयुक्त, सार्वजनिक आरोग्य खात्याचे अधिकारी, संबंधीत खाते प्रमुख, वरिष्ठ अधिकारी आणि महापालिकेच्या रुग्णालयांचे अधिष्ठाता व संबंधीत तज्ज्ञ डॉक्टर देखील या बैठकीला उपस्थित होते.
गेल्या काही दिवसात कोविड बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहे. यापूर्वीचे याबाबतचे अनुभव लक्षात घेता, कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत आपण अत्यंत सजग व सतर्क राहून अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. या अनुषंगाने केंद्र व राज्य शासनाद्वारे वेळोवेळी देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी अधिक काटेकोरपणे करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डाॅ. इकबाल सिंह चहल यांनी आजच्या बैठकी दरम्यान दिले. या बैठकीदरम्यान चर्चिले गेलेले प्रमुख मुद्दे व संबंधीत आदेश व माहिती पुढील प्रमाणे आहेत.
▪कोविडच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेच्यावेळी बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ज्या जागा कोविड उपचार केंद्रांसाठी ताब्यात घेण्यात आल्या होत्या तसेच ज्या रुग्णालयांच्या खाटा ताब्यात घेण्यात आल्या होत्या, त्याविषयीची माहिती अद्ययावत व सुधारित करण्याचे निर्देश
▪बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये संभाव्य गरजेनुसार प्राणवायू (ऑक्सिजन) पुरवठा बाबत तातडीने खातरजमा करून घेण्याचे निर्देश. तसेच प्राणवायूची उपलब्धता ही राज्य शासनाच्या निर्देशांनुसार गरजेपेक्षा अधिक असणे आवश्यक असल्याचे नमूद करून त्यानुसार प्राणवायू साठा उपलब्धतेबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश
▪कोविड प्रतिबंधाच्या दृष्टीने आवश्यक असणा-या ३ बाबींचे परिपूर्ण पालन सर्व ठिकाणी योग्यप्रकारे होत असल्याची खातरजमा व जनजागृती नियमितपणे करण्याचे निर्देश
▪यामध्ये योग्यप्रकारे मास्क परिधान करणे, सामाजिक अंतर राखणे आणि वारंवार योग्यप्रकारे साबणाने हात धुणे या बाबींचा समावेश आहे.
▪बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 'मास्क' न लावणा-यांवर करण्यात येत असलेली दंडात्मक कारवाई अधिक तीव्र करण्याचे निर्देश.
▪'ओमायक्राॅन'सह कोविड विषाणूंच्या उपप्रकारांच्या संभाव्य प्रादुर्भावाची शक्यता लक्षात घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिकेची सर्व रुग्णालये आणि जम्बो कोविड रुग्णालये यांना सतर्क व सुसज्ज राहण्याचे निर्देश.
▪या अंतर्गत प्रामुख्याने सर्व रुग्णालयांमधील आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा, जसे की, रुग्णखाटा, रुग्णवाहिका, रुग्णालयातील मनुष्यबळ, आवश्यक ती साधनसामुग्री, औषधोपचार विषयक बाबी, औषधे-गोळ्या-इंजेक्शन्स साठा इत्यादी सर्व बाबींचा आढावा घेऊन संभाव्य गरजेनुसार सदर बाबी अद्ययावत करण्याचे निर्देश.
▪बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व २४ विभागातील 'विभागीय नियंत्रण कक्ष' (Ward War Room) यांच्या कामकाजाचा नियमित आढावा अधिक बारकाईने घेण्याचे निर्देश.
▪या अंतर्गत प्रामुख्याने तेथील मनुष्यबळ, तांत्रिक सेवा-सुविधा इत्यादी बाबींचा आढावा घेऊन गरजेनुसार आवश्यक त्या सुधारणा करण्याचे निर्देश.
▪सर्व २४ विभागांमध्ये विभागांच्या स्तरावर सर्वंकष आढावा घेऊन सूक्ष्म स्तरीय नियोजन करण्याचे निर्देश.
▪बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ज्या रुग्णालयांमध्ये व जम्बो कोविड रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन केंद्रे सुरु करण्यात आली आहेत, त्यांच्या क्षमतेची चाचणी घेण्याचे व रुग्णालयांमधील प्रत्येक ऑक्सिजन बेडपर्यंत ऑक्सिजन योग्यप्रकारे व योग्य प्रमाणात पोहोचत असल्याची खातरजमा करण्याचे निर्देश.
▪कोविड बाधा झाल्याची चाचणी लवकरात लवकर होणे हे रुग्णाच्या दृष्टीने तसेच कोविड प्रतिबंधाच्या दृष्टीने आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन महापालिका क्षेत्रात विविध ठिकाणी कोविड चाचणी केंद्रे कार्यरत आहेत. तरी ज्यांना कोविडची लक्षणे असतील, त्यांनी कोविड चाचणी केंद्रात जाऊन कोविड चाचणी करुन घ्यावी. या अनुषंगाने आपल्या विभागातील कोविड चाचणी केंद्राची माहिती 'वॉर्ड वॉर रुम'द्वारे उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तरी संबंधीत नागरिकांनी आपल्या विभागाच्या वॉर्ड वॉर रुमशी संपर्क साधावा.
• 'ओमायक्राॅन' या कोविड विषाणूच्या उपप्रकाराच्या प्रसाराची संभाव्यता लक्षात घेता खबरदारीची उपाययोजना म्हणून आणि कोविड या साथरोगाचा संसर्ग इतरांना होऊ नये, या उद्देशाने प्रतिबंधात्मक नियमांची अंमलबजावणी अत्यंत कठोरपणे व ठामपणे करण्यात येत आहेत. यामुळे मुंबईकर नागरिकांची काही प्रमाणात गैरसोय होऊ शकते, याची नम्र जाणीव महानगरपालिका प्रशासनाला आहे. तथापि, 'कोविड' प्रतिबंधाच्या दृष्टीने आणि व्यापक जनहिताच्या दृष्टीने हे गरजेचे असून, यासाठी सर्व संबंधितांनी परिपूर्ण सहकार्य करावे; असे आवाहन देखील या अनुषंगाने मनपा प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे.
रिपोर्टर