कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर गर्दी करू नका -केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले
मुंबई : लोकवार्ता टाइम्स
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी दरवर्षी चैत्यभूमी येथे प्रचंड गर्दी उसळते.मागील वर्षी कोरोना मुळे चैत्यभूमी वर अनुयायांनी गर्दी न करता अभिवादन केले. यावर्षी मात्र सर्वानाच चैत्यभूमीवर पोहोचण्याची इच्छा आहे.मात्र कोरोनाचे संकट अद्याप समूळ नष्ट झालेले नाही. दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या ओमीक्रॉन या कोरोनाच्या नव्या घातक व्हेरियंटमुळे धोका वाढला आहे. त्यामुळे यंदा ६ डिसेंबरला महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी येथे गर्दी न करता अनुयायांनी घरूनच महामानवाला अभिवादन करावे, असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.
यंदाच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वतयारीची आढावा बैठक मुख्यमंत्र्यांनी घेतली नाही. तसेच याबाबत उपमुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली असली तरी ती फार उशिरा घेतली आहे. त्यामुळे प्रशासनाने ६५ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनुयायांना द्यावयाच्या सुविधा आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर द्यावयाच्या सूचना मार्गदर्शन उशिरा जाहीर करण्यात आले. याबाबत मी स्वतः १ नोव्हेंबर रोजी बैठक घेऊन ६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्व तयारीचा आढावा घेऊन चैत्यभूमीवर येणाऱ्या भीम अनुयायांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करावयाचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करण्याची सूचना केली होती. मात्र अद्याप मुख्यमंत्र्यांनी याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा अथवा आवाहन केले नाही, असे ना रामदास आठवले म्हणाले. देश विदेशातून राज्य भरातून दरवर्षी ६ डिसेंबर चैत्यभूमीवर येऊन आंबेडकरी अनुयायी आपल्या प्राणप्रिय मुक्तीदात्याला महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करतात.
कोट्यवधी भीम अनुयायांची गर्दी शिस्तीत येते आणि जाते. त्यांना यंदा ओमीक्रॉन या व्हेरियंटचा धोका असल्याने गर्दी न करता घरूनच महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करावे. आपल्या गावात, तालुक्यात, विभागात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून गर्दी करता महापरिनिर्वाण दिनी महामानवाला अभिवादन करावे, असे आवाहन रामदास आठवले यांनी केले आहे. ज्यांचे कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस झाले आहेत त्यांना चैत्यभूमीवर दर्शन अभिवादनसाठी परवानगी द्यावी, याबाबत आपण शासनाला सूचित केले आहे. यंदाचा महापरिनिर्वाण दिन कार्यक्रम चैत्यभूमीवरून दूरचित्रवाणीवर थेट प्रक्षेपित केला जाणार असल्याने घरी राहून ही अनुयायांना महामानवाला अभिवादन करता येईल, असेही आठवले म्हणाले .
रिपोर्टर