Breaking News
अवयव-दान नोंदणी करुन डोनर कार्ड सोशल मिडीयावर अपलोड करण्याचे महापालिकेचे आवाहन
मुंबई : लोकवार्ता टाइम्स
२७ नोव्हेंबरच्या राष्ट्रीय अवयव-दान दिनानिमित्त महानगरपालिकेच्या प्रमुख रुग्णालयांमध्ये जाऊन अवयव-दान नोंदणी अवश्य करावी. अवयव-दान नोंदणी केल्यावर त्याबाबतची माहिती आपले जवळचे नातेवाईक व मित्र यांना आवर्जून सांगावी, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या के. ई. एम. रुग्णालयांचे अधिष्ठाता तथा ‘रिजनल कम स्टेट ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन’ (ROTTO-SOTTO) केंद्राचे अध्यक्ष डॉ. हेमंत देशमुख यांनी केले आहे. तसेच नोंदणी केल्यावर प्राप्त होणारे 'डोनर कार्ड' शक्य असल्यास आपल्या इन्स्टाग्राम, ट्वीटर, फेसबुक, व्हॉट्स-अप इत्यादी 'सोशल मिडिया अकाउंट' वर जरूर अपलोड करावे, जेणेकरून आपल्या अवयव दाता नोंदणीची माहिती आपल्या परिचितांपर्यंत प्रभावीपणे पोहोचेल आणि एका सकारात्मक कार्याबाबत जनजागृती देखील साध्य होऊ शकेल, असेही आजच्या अवयव-दान दिनाच्या निमित्ताने आवर्जून नमूद करण्यात येत आहे.
परळ परिसरात असणा-या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या राजे एडवर्ड स्मारक रुग्णालय (K.E.M. Hospital) येथे देशाच्या पश्चिम विभागासाठीचे आणि महाराष्ट्र राज्याचे ‘रिजनल कम स्टेट ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन’ (ROTTO-SOTTO) चे कार्यालय सन – २०१७ पासून कार्यरत आहे. तर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्याच लोकमान्य टिळक महापालिका सर्वोपचार रुग्णालयाच्या परिसरात 'विभागीय प्रत्यारोपण समन्वय केंद्र' (Zonal Transplant Coordination Centre / ZTCC) कार्यरत आहे. या दोन्ही कार्यालयांद्वारे आपापल्या कार्यक्षेत्रातील अवयवदाना संबंधी सर्व कार्यवाहींचे समन्वयन केले जाते. .
‘रिजनल कम स्टेट ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन’ (ROTTO-SOTTO) च्या महाराष्ट्र राज्य व पश्चिम विभागाच्या केंद्र संचालक डॉ. सुजाता पटवर्धन यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात आतापर्यंत सुमारे २० हजार दात्यांनी अवयव दानासाठी नोंदणी केलेली आहे. तर या केंद्राच्या समन्वयातून सन – २०१७ पासून आतापर्यंत ५८० मेंदू मृत दात्यांद्वारे ७८० व्यक्तिंना मूत्रपिंड (Kidney), ४८० व्यक्तिंना यकृत (Liver), १३० व्यक्तिंना हृदय (Heart), ४३ व्यक्तिंना फुप्फुसे (Lungs), ६ व्यक्तिंना स्वादुपिंड (Pancreas), ३ व्यक्तिंना आतडे (Intestine) तर ४ हात दान करण्यात आले आहेत. याचाच अर्थ ५८० मेंदू मृत दात्यांद्वारे सुमारे १ हजार ४७५ व्यक्तिंना अवयव-दान करण्यात आले आहे. विशेष म्हणजे वरील तपशिलानुसार असणा-या ५८० मेंदू मृत दात्यांपैकी २४२ दाते हे मुंबईतील आहेत. या २४२ दात्यांद्वारे सन – २०१७ पासून ३१९ व्यक्तिंना मूत्रपिंड (Kidney), १८५ व्यक्तिंना यकृत (Liver), ६७ व्यक्तिंना हृदय (Heart), २६ व्यक्तिंना फुप्फुसे (Lungs), ६ व्यक्तिंना स्वादुपिंड (Pancreas), एका व्यक्तिला आतडे (Intestine) आणि एका व्यक्तिला दुहेरी हात दान करण्यात आला आहे. याचाच अर्थ २४२ मेंदू मृत दात्यांद्वारे सुमारे ६०५ व्यक्तिंना अवयव-दान करण्यात आले आहेत, अशीही माहिती डॉ. पटवर्धन यांनी या निमित्ताने दिली आहे.
तसेच अवयव दानासंबंधीच्या प्रतिक्षा यादीवर साधारणपणे ६,७४८ गरजूंची नोंदणी आहे. यामध्ये प्रामुख्याने ५,३७४ मूत्रपिंड (किडनी), १,१९४ यकृत (लिव्हर), १०१ हृदय, २१ फुफ्फुसे (Lungs), ५३ स्वादुपिंड (Pancreas) व ५ आतडे (Intestine) यासाठीच्या गरजूंचा समावेश आहे. ही बाब लक्षात घेता आपण सर्वांनी अवयव-दाता म्हणून नोंदणी करणे अतिशय महत्त्वाची समाज उपयोगी बाब असून काळाची गरज आहे.
अवयव-दान नोंदणी पद्धती :
आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील अवयवांचा सकारात्मक उपयोग व्हावा यासाठी अवयव दाता म्हणून नोंदणी करणे गरजेचे आहे. ही नोंदणी प्रक्रिया अत्यंत सोपी व सुटसुटीत असून यासाठी केवळ एक पानी अर्ज भरुन द्यावा लागतो. या अर्जामध्ये आपले नाव, पत्ता, वय यासारख्री अत्यंत प्राथमिक माहिती नमूद करावी लागते. तसेच या अर्जावर अर्जदाराची व त्याच्या जवळच्या एका नातेवाईकाची स्वाक्षरी (सही) असणे आवश्यक असते. हा अर्ज भरुन झाल्यावर तो महानगरपालिकेच्या प्रमुख रुग्णालयातील संबंधीत कक्षाकडे जमा करणे आवश्यक आहे. याबाबतच्या संपर्कासाठीचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
रिजनल कम स्टेट ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन (ROTTO-SOTTO), ७ वा मजला, नवीन इमारत, के. ई. एम. रुग्णालय परिसर, आचार्य दोंदे मार्ग, परळ (पूर्व), मुंबई – ४०० ०१२ तसेच अवयव-दान व दाता नोंदणीची माहिती www.rottosottokem.in किंवा www.mahaayudaan.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
रिपोर्टर