Breaking News
यंदाचा गणेशोत्सव अधिकाधिक पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन
महापालिका आयुक्तांच्या मार्गदर्शनात बैठक संपन्न
विविध समन्वय समितींच्या प्रतिनिधींसह नौदल, पोलीस आणि संबंधितांची उपस्थिती
मुंबई : लोकवार्ता टाइम्स
यंदाच्या गणेशोत्सवानिमित्ताने विविध समन्वय समितींच्या प्रतिनिधींसह नौदल, पोलीस आणि संबंधितांच्या उपस्थितीत मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात एक बैठक पार पडली. मुंबई महापालिका आयुक्तांच्या मार्गदर्शनात पार पडलेल्या बैठकीत यंदाचा गणेशोत्सव अधिकाधिक पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन डॉ. इकबाल सिंह चहल यांनी या बैठकीदरम्यान सर्व संबंधितांना केले.
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राची सांस्कृतिक ओळख असणारा श्री गणेशोत्सव हा गेली २ वर्षे ‘कोविड - १९’ या साथरोगाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती काळजी घेऊन आपण साजरा केला. या दरम्यान बृहन्मुंबई महानगरपालिकेने वेळोवेळी केलेल्या सुचनांना मुंबईकर नागरिकांनी अतिशय चांगला प्रतिसाद दिला. यंदा आपण हा उत्सव अधिक उत्साहाने साजरा करणार आहोत. या उत्सावाच्या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे देण्यात आलेल्या व वेळोवेळी दिल्या जाणा-या सुचनांचे आपण अधिकधिक काटेकोरपणे पालन करावे आणि यंदाचा श्रीगणेशोत्सव अधिकाधिक पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करावा, असे आवाहनही चहल यांनी सर्व संबंधितांना केले.
बैठकीत देण्यात आलेले निर्देश
• बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे आतापर्यंत देण्यात आलेल्या मंडप परवानग्या, गणेशोत्सवासंबंधीच्या परवानग्या आदी माहिती बैठकीदरम्यान संगणकीय सादरीकरणाद्वारे देण्यात आली. तसेच कृत्रिम तलावांची आकडेवारी, करण्यात येत असलेले नियोजन इत्यादीची माहिती देखील बैठकीदरम्यान देण्यात आली.
• श्रीगणेश विसर्जन मिरवणुकांचे मार्ग हे प्राधान्याने सन - २०१९ नुसार ठेवण्याचे निर्देश.
• बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये श्री गणेशोत्सवासाठी स्वतंत्र समन्वय अधिकारी नेमण्याचे निर्देश.
• महत्त्वाच्या सर्व विसर्जन स्थळी बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे वैद्यकीय चाचणी व प्रथमोपचार कक्ष कार्यान्वित करण्यात येणार.
• श्रीगणेश मूर्ती विसर्जन मार्गांची रस्ते खात्याने काळजीपूर्वक पाहणी करावी व सदर मार्गांवर खड्डे असल्यास ते योग्यप्रकारे भरुन घ्यावेत, असे निर्देश महानगरपालिका आयुक्तांनी उप आयुक्त (पायाभूत सुविधा) यांना दिले.
• मुंबईतील ज्या पुलांवरुन विसर्जन मिरवणुका जातात, त्या पुलांची पाहणी करण्याचे प्रमुख अभियंता (पूल) यांना निर्देश.
• विसर्जन स्थळी असणा-या फिरत्या शौचालयांची स्वच्छता राखण्यासाठी आवश्यकतेनुसार स्वयंसेवी संस्थांकडून कामगार उपलब्ध करुन घेण्याचे निर्देश.
• रस्त्यांवर केबल लटकत असल्यास त्यामुळे श्रीगणेश विसर्जन मिरवणुकांना बाधा येऊ शकते, ही बाब लक्षात घेऊन अनधिकृत केबल असल्यास त्या तातडीने हटविण्याचे निर्देश.
• भरती - ओहोटीचे वेळापत्रक हे संबंधित विसर्जन स्थळी ठळकपणे लावण्याचे निर्देश.
• श्रीगणेश मूर्ती विसर्जनानंतर विसर्जित मूर्तींची छायाचित्रे किंवा व्हिडिओचित्रण कोणीही करु नये, अशा सूचना प्रदर्शित करण्याची विनंती समन्वय समितीतर्फे करण्यात आली. त्यानुसार या प्रकारच्या सूचना प्रदर्शित करण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्तांनी संबंधितांना दिले.
• बैठकीच्या अखेरीस यंदाचा श्री गणेशोत्सव हा अधिकाधिक पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले.
या बैठकीला अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, ‘बेस्ट’चे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) आशीष शर्मा, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार उपस्थित होते. तसेच मुंबई इमारत दुरुस्ती मंडळाचे सभापती तथा मुंबई उपनगरे गणेशोत्सव समन्वय समितीचे सचिव विनोद घोसाळकर, सह आयुक्त (महानगरपालिका आयुक्त कार्यालय) चंद्रशेखर चोरे, उप आयुक्त (परिमंडळ २) तथा गणेशोत्सव समन्वयक हर्षद काळे यांच्यासह बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध परिमंडळांचे आणि खात्यांचे उप आयुक्त, विभागांचे सहाय्यक आयुक्त आणि संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. त्याचबरोबर भारतीय नौदल, मुंबई पोलीस दल, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती, मुंबई उपनगरे श्री गणेश उत्सव समन्वय समिती, अखिल भारतीय सार्वजनिक गणेशोत्सव महासंघ, मूर्तीकार संघटनांचे प्रतिनिधी आदी मान्यवर उपस्थित होते.
रिपोर्टर