Breaking News
सप्टेंबर महिन्यात मुंबईतील आतापर्यंतच्या विक्रमी लसीकरणाची नोंद
- दिले २९ लाख ५१ हजार १५७ डोस
मुंबई : लोकवार्ता टाइम्स
अधिकाधिक मुंबईकर नागरिकांचे आणि सर्व समाज घटकांचे कोविड प्रतिबंधक लसीकरण करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या अथक प्रयत्नांचा परिपाक म्हणून सप्टेंबर २०२१ या एकाच महिन्यात मुंबईतील आतापर्यंतच्या विक्रमी लसीकरणाची नोंद झाली आहे. एकट्या सप्टेंबर महिन्यात २९ लाख ५१ हजार १५७ डोस दिले गेले आहेत. यामध्ये शासकीय, महानगरपालिका व खासगी लसीकरण केंद्रांचांही समावेश आहे.
जुलै, ऑगस्ट महिन्यात सुमारे १० लाख लशींचा सरासरी साठा प्रशासनाला प्राप्त झाला होता. त्या तुलनेत सप्टेंबर महिन्यात जवळपास दुप्पट म्हणजे १९ लाख २५ हजार १४० लससाठा प्राप्त झाला. तरीही संपूर्ण लससाठ्याचा विनियोग होईल, अशा रितीने लसीकरणाला वेग देण्यात आला. बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य यंत्रणेने ही कौतुकास्पद कामगिरी केली आहे.
प्रारंभापासून विचार करता, बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सर्व शासकीय, महानगरपालिका तसेच खासगी लसीकरण केंद्रांवर मिळून दिनांक १६ जानेवारी २०२१ ते आज ३० सप्टेंबर २०२१ (सायंकाळी ७ वाजेपर्यंत) या कालावधीत कोविड-१९ प्रतिबंधक लशीच्या १ कोटी २३ लाख ११ हजार ५४१ इतक्या मात्रा देण्यात आल्या आहेत.
मुंबई महानगरपालिका प्रशासनाला या कालावधीत एकूण ७७ लाख ६२ हजार ४७० लसींचा साठा प्राप्त झाला. त्यातून आजवर ७६ लाख ९६ हजार ८३३ एवढ्या मात्रा देण्यात आल्या. मुंबईकर नागरिकांचे लसीकरण अत्यंत वेगाने करण्यात येत असल्याचे यावरुन स्पष्ट होते. फक्त महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशात, १० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्येच्या शहरांचा विचार केला तर वेगाने लसीकरण करण्याबाबत मुंबई पहिल्या क्रमांकावर आहे, ही बाब उल्लेखनीय आहे.
कोविड- १९ प्रतिबंध राष्ट्रीय लसीकरण मोहीम अंतर्गत दिनांक १६ जानेवारी २०२१ पासून मुंबई महानगरात अधिकाधिक वेगाने व जास्तीत-जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका सतत प्रयत्नशील आहे. लसीकरणाची व्याप्ती टप्प्या-टप्प्याने वाढू लागली तशी लस साठ्याची गरजही वाढली. प्रारंभीच्या काळामध्ये, पुरेसा लससाठा प्राप्त झाला नाही, त्या दिवसांसाठी लसीकरण नाईलाजाने बंदही ठेवावे लागत होते. मात्र आता पुरेसा लससाठा प्राप्त होत असल्याने त्याच वेगाने लसीकरण करण्याचे सातत्य टिकून आहे. याचे मुख्य कारण म्हणजे लससाठा प्राप्त करण्यासाठी पाठपुरावा करण्यापासून ते लससाठा मिळाल्यानंतर जलदगतीने लसीकरण करेपर्यंत महानगरपालिकेची आरोग्य यंत्रणा अथक प्रयत्न व अचूक नियोजन करते आहे. लससाठा मिळताच त्याचा २ ते ३ दिवसात संपूर्ण विनियोग केला जातो. लससाठा साठवण क्षमता आणि लस देण्याची क्षमता या दोन्ही पैलुंचे बारकाईने नियोजन केल्याने लसीकरण वेगाची ही क्षमता साध्य झाली आहे.
लसीकरण मोहिमेला वेग देताना महानगरपालिकेने विविध समाज घटकांचा देखील विचार करुन त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले आहेत. लसीकरण केंद्रांवर जास्त वेळ रांगेत उभे रहावे लागू नये म्हणून ज्येष्ठ नागरिकांसाठी ड्राईव्ह-इन लसीकरण, अंथरुणास खिळून असलेल्या नागरिकांचे त्यांच्या घरी जाऊन लसीकरण, दिव्यांग व्यक्ती, आदिवासी बांधव, कारागृहांमधील बंदिवान, विदेशात शिक्षण अथवा नोकरी / व्यवसायासाठी जाणारे नागरिक, एलजीबीटी समुदायातील नागरिक इत्यादींसाठी विशेष केंद्र, फक्त महिलांसाठी राखीव विशेष लसीकरण सत्र, शिक्षक आणि १८ वर्ष वयावरील विद्यार्थी यांच्यासाठी राखीव सत्र, फक्त दुसरा डोस देय असणाऱया नागरिकांसाठी राखीव सत्र अशा निरनिराळ्या उपाययोजना महानगरपालिकेने केल्या आहेत. त्याचा परिणाम म्हणून सर्व समाज घटकांपर्यंत पोहोचून सर्वाधिक वेगाने लसीकरण करण्यात मुंबई आघाडीवर आहे. समाजातील कोणताही घटक लसीकरणातून वंचित राहणार नाही, याची पुरेपूर दक्षता प्रशासन घेत आहे.
जानेवारी २०२१ मध्ये मुंबई महानगरात शासकीय व महानगरपालिका मिळून एकूण १२ लसीकरण केंद्र होती. तर त्यावेळी एकही खासगी केंद्र नव्हते. आजघडीला मुंबई महानगरात शासकीय व महानगरपालिका मिळून ३२५ तर खासगी १३९ असे एकूण ४६४ कोविड लसीकरण केंद्र कार्यान्वित आहेत. लसीकरण केंद्रांची संख्याही योग्यरित्या वाढवत नेल्याने लसीकरणाला गती देण्यास हातभार लागला आहे.
प्रारंभी, महानगरपालिकेच्या वतीनेच लस खरेदी करुन त्यातून खासगी केंद्रांना लससाठा पुरविण्यात येत होता. दिनांक १ मे २०२१ पासून सुधारित धोरणानुसार खासगी केंद्राना लस खरेदीची परवानगी मिळाली. ही बाब लक्षात घेता, जानेवारी ते एप्रिल २०२१ या कालावधीत बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला २५ लाख ९४ हजार ४५० इतका लससाठा मिळाला. पैकी, शासकीय व महानगरपालिका केंद्रांवर १८ लाख २३ हजार ५६७ तर खासगी केंद्रांवर ६ लाख २४ हजार ५५१ असे एकूण २४ लाख ४८ हजार ११८ डोस देण्यात आले होते.
खासगी केंद्रांना लस खरेदीची मुभा मिळाल्यानंतरच्या कालावधीत म्हणजे दिनांक १ मे २०२१ ते आज ३० सप्टेंबर २०२१ सायंकाळी ७ वाजेपर्यंत या कालावधीत महानगरपालिकेला एकूण ५१ लाख ६८ हजार ०२० लस मात्रा प्राप्त झाल्या. याच कालावधीत शासकीय व महानगरपालिका केंद्र मिळून एकूण ५२ लाख ४८ हजार ७१५ इतके डोस (दिनांक ३० एप्रिल २०२१ अखेरीस शिल्लक साठा जमेस धरुन) देण्यात आले. या कालावधीत मुंबईतील खासगी केंद्रांवर ४६ लाख १४ हजार ७०८ डोस देण्यात आले. म्हणजेच मे ते सप्टेंबर २०२१ या काळात शासकीय, महानगरपालिका, खासगी केंद्र असा एकत्रित विचार करता ९८ लाख ६३ हजार ४२३ मात्रा देण्यात आल्या आहेत.
रिपोर्टर