Breaking News
गेल ऑम्व्हेट यांचे पुण्यात स्मारक उभारण्यासाठी प्रयत्न करणार - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
मुंबई : लोकवार्ता टाइम्स
आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या समाज शास्त्रज्ञ; ज्येष्ठ विचारवंत लेखिका गेल ऑम्व्हेट यांचा आदर्श पुढील पिढीने घ्यावा त्यांच्या आठवणी जोपासाव्यात यासाठी त्यांचे पुण्यात स्मारक उभारण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत, असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.
मुंबई मराठी पत्रकार संघाच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात परिवर्तन साहित्य महामंडळ आणि रिपाइंतर्फे दिवंगत गेल ऑम्व्हेट यांच्या जाहीर श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून रामदास आठवले बोलत होते. यावेळी रिपाइंचे सरचिटणीस अविनाश महातेकर, ज्येष्ठ विचारवंत अर्जुन डांगळे, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, रिपाइं मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे, वैभव काळखैर, ॲड.आशाताई लांडगे, ॲड. अभयाताई सोनवणे; बाळासाजेब बनसोडे संजय पवार सोना कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
मूळ अमेरिकेत जन्मलेल्या गेल ऑम्व्हेट यांनी महात्मा फुले आंबेडकरी विचारधारा स्विकारून स्त्रियांच्या, दुष्काळग्रस्तांच्या, कामगार श्रमिकांच्या, दलित आदिवासींच्या प्रश्नांवर संघर्ष करीत राहिल्या. सांगलीचे भारत पाटणकर यांच्याशी विवाह करून त्या सांगलीत कासेगाव येथे राहिल्या. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. त्यांचा अधिक काळ पुण्यात गेला. त्यामुळे पुण्यात गेल ऑम्व्हेट यांचे स्मारक उभारण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे आठवले यावेळी म्हणाले. दिवंगत गेल ऑम्व्हेट यांनी मार्क्सवादाचा अभ्यास केला होता मात्र गेल यांच्यावर महात्मा फुले आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेचा प्रभाव होता असे आठवले यावेळी म्हणाले.
रिपोर्टर