Breaking News
घाटकोपर-मानखुर्द जोड रस्त्यावरील नवीन उड्डाणपुलावर वाहनवेग नियंत्रित करण्यासाठी दोन्ही बाजुने दर पाचशे मीटर अंतरावर बसविणार गतिरोधक
मुंबई : लोकवार्ता टाइम्स
वीरमाता जिजाबाई भोसले मार्गावर (घाटकोपर-मानखुर्द जोडमार्ग) बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने बांधण्यात आलेल्या नवीन उड्डाणपुलावरील वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी अतिरिक्त उपाययोजना करण्याचा निर्णय बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. यामध्ये वाहनांचा वेग नियंत्रित करण्याकरिता पुलाच्या दोन्ही बाजुने दर पाचशे मीटर अंतरावर गतिरोधक बसविणे, सीसीटीव्ही कॅमेरे लावणे, गतिरोधक दर्शक फलक बसविणे, डांबराच्या पृष्ठभागावर (मास्टिक अस्फाल्ट) वाहने घसरू नये, यासाठी सदर पृष्ठभाग खरबडीत (मिलिंग) करणे आणि अतिरिक्त रम्बलर्स बसविणे या उपाययोजनांचा यामध्ये समावेश करण्यात येणार असल्याचे महापालिकेच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
नव्याने बांधण्यात आलेल्या या उड्डाणपुलाचे लोकार्पण दिनांक १ ऑगस्ट २०२१ रोजी करण्यात आले. मानखुर्द वाहतूक विभागाच्या समन्वयाने तीन मीटर उंचीपर्यंतच्या हलक्या वाहनांसाठी हा उड्डाणपूल खुला करण्यात आलेला आहे. सदर उड्डाणपुलाचे बांधकाम हे इंडियन रोड काँग्रेस (आय.आर.सी.) ने विहित केलेल्या मानकाप्रमाणे म्हणजेच हलक्या व अवजड दोन्ही प्रकारच्या वाहनांसाठी केले आहे. सदर उड्डाणपूल संरचनात्मक दृष्ट्या योग्य आहे.
या उड्डाणपुलावरील मोहिते पाटील नगर जंक्शन येथे उच्च दाबाच्या तारा कमी उंचीवरून जात असल्यामुळे वाहतुकीदरम्यान वाहनांमध्ये विद्युत प्रेरण उत्पन्न होऊन दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेता, या उच्च दाबाच्या तारांची उंची वाढविण्यासाठी लागणा-या जागेचा ताबा मिळण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाकडे महानगरपालिका प्रशासनाकडून पाठपुरावा करण्यात येत आहे. तसेच, सदर जागा ताब्यात मिळाल्यानंतर महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमार्फत वीज तारा अधिक उंचीवर नेल्यानंतर या उड्डाणपुलावरून अवजड वाहनांना प्रवेश देण्यात येणार आहे.
या उड्डाणपुलावरील पृष्ठभागावर केंद्रीय रस्ते व वाहतूक यांच्या मानांकनाप्रमाणे व आय. आर. सी. मानकाप्रमाणे मास्टिक अस्फाल्ट टाकण्यात आले आहे. या मास्टिक अस्फाल्ट पृष्टभागावर 'पृष्ठभाग निर्देशांक" चाचणी करण्यात आली आहे. त्यात, हा पृष्ठभाग मानकाप्रमाणेच असल्याचे निदर्शनास आले आहे.
हा उड्डाणपूल ५० किलोमीटर प्रति तास या वेगाने वाहन नेण्यसाठी संकल्पित आहे. असे असले तरी, या उड्डाणपुलावरून चारचाकी व दुचाकी वाहनचालक खूप जास्त वेगाने वाहने चालवत असल्याचे निदर्शनास आले आहे. परिणामी, सदर वाहनचालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटून अपघात होण्याच्या घटना घडत असल्याचे निदर्शनास आले आहे.
यामुळे या उड्डाणपुलावर वाहनचालकांचा वेग नियंत्रित करण्यासाठी महानगरपालिकेमार्फत अतिरिक्त उपाययोजना हाती घेण्यात येत आहेत. यामध्ये पुलाच्या दोन्ही वाहिनीवर पाचशे मीटर अंतरावर गतिरोधक बसविणे, सीसीटीव्ही कॅमेरे लावणे, गतिरोधक दर्शक फलक बसविणे, डांबरी पृष्ठभागावर (मास्टिक अस्फाल्टवर) वाहने घसरू नये, यासाठी पृष्ठभाग खरबडीत (मिलिंग) करणे आणि अतिरिक्त रम्बलर्स बसविणे, या उपाययोजना प्रस्तावित आहेत, असे महापालिकेच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
रिपोर्टर