Breaking News
मुंबई महानगरपालिका निवडणूकीत महिलांना पन्नास टक्के उमेदवारी- रामदासजी आठवले
मुंबई : लोकवार्ता टाइम्स
अनंत धनसरे
महिलांना समान न्याय हक्क महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मिळवून दिले. रिपब्लिकन पक्षात महिलांना समान संधी दिली जाते. आगामी मुंबई मनपा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाची ५० टक्के उमेदवारी महिलांना देण्यात येईल, असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. ते जागतिक महिला दिना निमित्त रिपब्लिकन पक्षाच्यावतीने आयोजित महिला संमेलनात बोलत होते.
रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडीच्यावतीने वीर सावरकर सभागृहात जागतिक महिला दिनानिमित्त महिला संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योत माता सवित्राबाई फुले, त्यागमूर्ती माता रमाई या महामातांचा संयुक्तजयंती उत्सव साजरा करण्यात आला .यावेळी कोरोना काळात रुग्णसेवा केलेल्या महिला डॉक्टर आणि परिचारिका यांचा कोविड योद्धा म्हणून रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
संमेलनास सीमाताई आठवले; कुमार जित आठवले; रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर; राष्ट्रीय उपाध्यक्ष कृष्णमिलन शुक्ला ; दक्षिण मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ कासारे युवक आघाडीचे मुंबई अध्यक्ष रमेश कांबळे,महिला आघाडीच्या ॲड.आशाताई लांडगे, फुलाबाई सोनवणे, शिलाताई गांगुर्डे , मारवाडी आघाडीच्या अध्यक्षा वंदना मेहता, नैना वैराट उपस्थित होते.
सर्व जाती धर्माच्या महिलांना समान न्यायहक्क मिळवून देण्यासाठी विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदुकोड बिल सादर केले. महिला जागृत झाल्या तरच समाज जागृत होतो. आई शिक्षित झाली तर सर्व समाज शिक्षित होईल, असे डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांगत असत, असे रामदास आठवले म्हणाले.
रिपोर्टर