Breaking News
लाच घेणाऱ्या कारकूनावर महापालिका प्रशासनाची निलंबनाची कारवाई
- मृत्यू दाखला देण्यासाठी केली होती पैशांची मागणी
मुंबई : लोकवार्ता टाइम्स
मृत्यू दाखला आणि त्याच्या प्रती देण्यासाठी पैशांची मागणी करुन ती लाच स्वीकारणाऱ्या कारकूनावर महापालिका प्रशासनाने निलंबनाची कारवाई केली आहे. हा कारकून महापालिकेच्या आर/मध्य विभाग कार्यालयातील मृत्यू नोंदणी विभागामध्ये कार्यरत होता.
शशांक राव यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ट्विटर (@mybmc) या समाजमाध्यमावर तक्रार केली. आर/मध्य विभाग अंतर्गत कार्यरत एका कर्मचाऱ्याने पैशांची मागणी करुन ते स्वीकारल्याबद्दल ही तक्रार होती. त्याची तातडीने दखल घेवून महानगरपालिकेचे उपआयुक्त (सार्वजनिक आरोग्य) आणि कार्यकारी आरोग्य अधिकारी यांनी दिलेल्या दूरध्वनी आदेशानुसार आर/मध्य विभागाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांनी बाभई स्मशानभूमीमध्ये जाऊन तक्रारीची शहानिशा केली. त्यावेळी त्यांना या तक्रारीत तथ्य असल्याचे आढळले.
मुंबई महानगरपालिकेच्या आर/मध्य विभाग कार्यालयामध्ये मृत्यू नोंदणी कारकून म्हणून कार्यरत संतोष तांबे हा बाभई हिंदू स्मशानभूमी येथे दिनांक १७ जानेवारी २०२२ रोजी रात्री ११ ते सकाळी ७ या रात्रपाळीत कार्यरत होता. त्यावेळी राजेंद्रकुमार कृष्णदास किनारीवाला (वय ७२) यांचे पार्थिव अंतिमसंस्कार करण्यासाठी दिनांक १८ जानेवारी २०२२ रोजी सकाळी ६.१५ वाजता बाभई स्मशानभूमीत आणण्यात आले होते. अंतिम संस्कार करुन आटोपल्यावर मृत्यू दाखला कुठे मिळेल, याबाबत शशांक राव यांनी कर्तव्यावर हजर असलेले मृत्यू नोंदणी कारकून संतोष तांबे याच्याकडे विचारणा केली. त्यावेळी तांबे याने मृत्यू दाखला मी काढून देऊ शकतो, असे सांगून प्रत्येक दाखल्याच्या प्रतीसाठी १०० रुपये लागतील, असे सांगितले. राव यांनी ५ प्रती पाहिजे, असे सांगून तांबे यांना पाचशे रुपये दिले, अशी माहिती शहानिशा करताना निष्पन्न झाली आहे.
मृत्यू दाखल्याची पहिली प्रत विनामूल्य मिळते आणि त्यानंतर प्रत्येक छायाप्रतीसाठी सहा रुपये आकारले जातात. असे असताना मृत्यू नोंदणी कारकून संतोष तांबे याने त्याचे कर्तव्य पार पाडताना नितांत सचोटी राखली नाही तसेच कर्तव्यपरायणता ठेवली नाही. महानगरपालिका कर्मचाऱ्यास अशोभनीय ठरेल असे कृत्य केले. त्यांचे कृत्य हे गंभीर स्वरूपाच्या गैरवर्तणुकीचे असल्याने त्यांना प्राथमिक/ खात्यांतर्गत सर्वंकष चौकशीसापेक्ष निलंबित करण्यात आले आल्याचे महापालिकेच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
रिपोर्टर