Breaking News
हायकल लिमिटेड मधील कामगार आंदोलनाच्या पावित्र्यात
मुंबई : लोकवार्ता टाइम्स
महाड औद्योगिक क्षेत्रामधील हायकल लिमिटेड या उद्योगातील कामगार आक्रोश आंदोलनच्या तयारीत आहेत. कामगार नेते आमदार भाई जगताप यांच्या नेतृत्वाखालील भारतीय कामगार कर्मचारी महासंघातर्फे हे आक्रोश आंदोलन पुकारण्यात येणार आहे. हायकल व्यवस्थापनाकडे महासंघाने बोनसच्या संदर्भात केलेल्या मागणीवर हायकल व्यवस्थापनाने कुठलाही प्रतिसाद न देता उलट हटवाद जोपासण्याचा प्रयत्न केला आहे.
कोविड १९ च्या महामारीमध्ये कामगारांनी आपल्या जीवाची पर्वा न करता कंपनीच्या उत्पादनात खंड पडू दिला नाही. कंपनीला करोडो रुपयांचा फायदा करून दिला. महाड मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे महापूर येऊन महाड मधील अनेक कारखाने बाधित झाले. हायकल लिमिटेड मध्ये काम करणाऱ्या कामगार कर्मचाऱ्यांच्या घरात पाणी शिरल्यामुळे नुकसान झाले. त्यांची वित्तहानी झाली. काही कारखान्यांनी त्यांच्या कामगारांना मदत केली, पण हायकल लि. कंपनी व्यवस्थापनाने कामगारांना वाऱ्यावर सोडल्यामुळे काहीच मदत झाली नाही.
प्लॅन्टमध्ये होणाऱ्या प्रदुषणाकडे हेतूपुरस्पर दुर्लक्ष करून कामगारांच्या मानसिक, शारीरिक छळाबरोबरच कामगारांच्या आरोग्याची सुध्दा हेळसांड होत आहे. व्यवस्थापनाच्या ठराविक वरिष्ठ अधिकाऱ्यांची कामगारांच्या बाबतीत नकारात्मक वागणूक आहे. कंपनी व्यवस्थापनाला कामगारांचे कुठलेही प्रश्न सोडवण्याची अजिबात ईच्छा नसल्याची भावना कामगारांमध्ये निर्माण झाल्यामुळे कंपनीमध्ये अस्थिरतेचे वातावरण तयार झाले आहे. कंपनी ला करोडो रूपयांचा फायदा होऊनही दिवाळी जवळ असूनही बोनसच्या संदर्भात कुठलीही चर्चा नसल्यामुळे असंतोष पसरलेला आहे. '२२ ऑक्टोबर, २०२१ रोजीपर्यंत कंपनीकडून कुठलाही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही, तर कामगार आक्रोश आंदोलनाच्या तयारीत आहेत. यामुळे बोनस संदर्भात मार्ग निघालाच पाहिजे, नाहीतर उद्द्भवणाऱ्या परिस्थितीला व्यवसथापन जबाबदार राहील', असा इशारा कामगारांनी दिलेला आहे.
रिपोर्टर