Breaking News
इंग्रजीची भीती दूर करण्यासाठी राज्यातील मराठी शाळांमध्ये राबवणार द्वैभाषिक धोरण
मुंबई : लोकवार्ता टाइम्स
राज्यात मराठी भाषेतून शिक्षण अनिवार्य आहे. तथापि, शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये बालपणापासूनच मराठीसोबतच इंग्रजीतील संकल्पना स्पष्ट होण्यासाठी येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील सर्व मराठी माध्यम शाळांत पहिलीपासून एकात्मिक आणि द्वैभाषिक अभ्यास लागू करण्यात येईल, असे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांना मराठी सोबतच इंग्रजी भाषेतील संज्ञा, संकल्पना अधिक स्पष्ट व्हाव्यात, इंग्रजी भाषेतील शब्दांची ओळख व्हावी, यासाठी प्रा.गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाचे (बालभारती) संचालक विवेक गोसावी हे प्रत्यक्ष तर शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक देवेंद्र सिंग, शिक्षण संचालक (प्राथमिक) दिनकर टेमकर, शिक्षण संचालक (माध्यमिक) महेश पालकर ऑनलाईन उपस्थित होते.
गायकवाड म्हणाल्या, सध्या 488 आदर्श शाळांत प्रायोगिक तत्त्वावर पहिलीच्या अभ्यासक्रमात एकात्मिक व द्वैभाषिक पुस्तकांचा समावेश करण्यात आला आहे. या पथदर्शी प्रकल्पाचे यश पाहता मराठी शाळांत याची अंमलबजावणी करण्यात येईल. त्याचप्रमाणे टप्प्याटप्प्याने पुढील वर्गाच्या अभ्यासक्रमात इतर शाळांमध्ये याची अंमलबजावणी करण्यात येऊन विद्यार्थ्यांना मराठीसह इंग्रजी भाषेतील संज्ञा, दैनंदिन शब्द, संकल्पना स्पष्टपणाने समजाव्यात, मराठी शब्दांच्या जोडीला सोप्या इंग्रजीमधील शब्द, वाक्यांचा उपयोग समजावा अशाप्रकारे पाठ्यपुस्तकांची रचना करावी, असे निर्देश राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाना दिले आहेत. पाठ्यपुस्तकांची रचना आकर्षक, जागतिक दर्जाची असावी, असेही निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत.
पहिल्या टप्प्यात प्रायोगिक तत्त्वावर धोरण राबणार द्वैभाषिक भाषा धोरण
सध्या राज्यातील ४८८ आदर्श शाळांमध्ये राबवण्यात येणार आहे. या शाळेतील पहिलीच्या अभ्यासक्रमात द्वैभाषिक पुस्तकांचा समावेश करण्यात आला असून २०२० -२३ या शैक्षणिक वर्षामध्ये दुसरीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना द्वैभाषिक पाठ्यपुस्तक उपलब्ध करुन दिली जातील. मराठी शब्दांच्या जोडीला विद्यार्थ्यांना समजण्यासाठी सोप्या इंग्रजीमधील शब्द आणि वाक्यांचा उपयोग समजावा अशा प्रकारे पाठ्यपुस्तकांची रचना करण्यात यावी, अशा सूचना शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केल्या.
१ डिसेंबरपासून शाळा सुरु
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्य मंत्रिमंडळ पीडियाट्रिक टास्क फोर्स यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांच्या समंती नंतर राज्यात 1 डिसेंबरपासून पहिली पासून वर्ग सुरु होत आहेत. राज्य मंत्रिमंडळाने 1 डिसेंबरपासून ग्रामीण भागात पहिली ते चौथी व शहरी भागात पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. शाळांत येणाऱ्या मुलांत प्रथमच शाळेची पायरी चढणारी मुले देखील असतील. मुलांचे आरोग्य व त्यांची सुरक्षा हेच आमच्यासाठी प्राधान्यक्रमाने कायम महत्त्वाचे राहिले असल्याचंही वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले.
रिपोर्टर