Breaking News
गिरणी कामगारांची प्रलंबित प्रकरणे म्हाडा काढणार निकाली
- २१, २२ डिसेंबरला विशेष शिबिराचे आयोजन
मुंबई : लोकवार्ता टाइम्स
म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडा) गिरणी कामगारांसाठी २८ जून २०१२, ९ मे २०१६ आणि ०२ डिसेंबर २०१६ रोजी सोडती काढण्यात आलेल्या. या सोडतींमधील प्रलंबित प्रकरणे म्हाडामार्फत निकाली काढण्यात येणार आहेत. म्हाडाने यासाठी मुंबईतील वांद्रे पूर्व येथील समाज मंदिर हॉल येथे दि. २१ व २२ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत विशेष शिबिराचे आयोजन केले आहे.
मुंबई मंडळातर्फे गिरणी कामगारांसाठी काढलेल्या उपरोक्त नमूद सोडतींमधील यशस्वी अर्जदारांना गाळा वितरणाचे प्रथम सूचना पत्र पाठवण्यात आले आहेत. त्यानुसार गिरणी कामगार अथवा वारस यांनी सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी करून पात्र / अपात्रतेच्या निर्णयासाठी सदरच्या मूळ नस्ती प्राधिकृत/ अपील अधिकारी यांच्याकडे पाठवण्यात आल्या आहेत. बहुतांश गिरणी कामगार अथवा वारस यांनी सादर केलेली कागदपत्रे ही अपूर्ण असल्याने संबंधित प्राधिकृत अधिकारी अधिकारी यांनी संबंधित यशस्वी अर्जदारांना आवश्यक असणारी कागदपत्रे सादर करण्याबाबत वेळोवेळी कळविले आहे तसेच स्मरणपत्र सुद्धा पाठविली आहेत. मात्र, आवश्यक असणारी कागदपत्रे सादर न केल्याने संबंधित यशस्वी अर्जदारांच्या पात्र/अपात्रतेबाबतचा निर्णय प्रलंबित आहे.
त्यामुळे उपरोक्त सोडतींमधील प्राधिकृत/अपिल अधिकारी यांच्याकडे प्रलंबित असणारी प्रकरणे तात्काळ निकाली काढण्यासाठी विशेष मोहिमेअंतर्गत सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचे म्हाडामार्फत सांगण्यात आले. उपरोक्त सोडतींमधील ज्या यशस्वी गिरणी कामगार अथवा वारस यांची पात्रता निश्चिती कागदपत्र सादर न केल्यामुळे झालेली नाही, अशा गिरणी कामगार /वारसांची यादी म्हाडाच्या https://mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर यादीमध्ये नमूद यशस्वी गिरणी कामगारांनी या विशेष शिबिरात आवश्यक कागदपत्रे व ओळखपत्रासह सहभागी होण्याचे आवाहन मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाचे मुख्य अधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी केले आहे. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर शासनाने आखून दिलेल्या नियमावलीचे पालन या शिबिरात केले जाणार आहे, याची दखल शिबिरास उपस्थित राहणाऱ्या यशस्वी गिरणी कामगारांनी घ्यावी, असे आवाहन डॉ. म्हसे यांनी केले आहे.
रिपोर्टर