Breaking News
विधानपरिषदेची आमदारकीची माळ शिवसेनेचे निष्ठावंत सुनील शिंदेच्या गळ्यात
मुंबई : लोकवार्ता टाइम्स
मुंबई महापालिकेतून निवडून देण्याच्या जागेवर शिवसेनेतर्फे वरळी येथील माजी आमदार सुनील शिंदे यांना संधी मिळाली आहे. शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांच्यासाठी आपली आमदारकीची जागा दिली होती. या जागी राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेले माजी मंत्री सचिन अहिर, शिवसेनेचे सचिव मिलींद नार्वेकर, सुरज चव्हाण, युवा सेना पदाधिकारी राहुल कनाल, वरुण सरदेसाई यांच्या नावाची चर्चा होती. परंतु ही आमदारकीची माळ माजी आमदार सुनील शिंदे यांच्या गळ्यात पडली. शिंदे याचे वरळी विभागात फार प्राबल्य असून त्यांचा मतदारांशी थेट जनसंपर्क असून ते नागरिकांना भेटून त्यांचे प्रश्न सोडवत असतात. त्यांना आमदारकीची संधी दिल्याबद्दल वरळी येथील नागरिकांनी आनंद व्यक्त करून जल्लोष केला.
भारतीय जनता पक्षाने विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे. मुंबईतून माजी आमदार राजहंस सिंह, नागपूरमधून माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कोल्हापूरमधून अमल महाडिक, अकोला-बुलढाणा-वाशिम मतदारसंघात वसंत खंडेलवाल आणि धुळे-नंदुरबारमध्ये विद्यमान आमदार अमरिश पटेल यांना उमेदवार म्हणून संधी दिली आहे. मुंबईत काॅंग्रेसमधून आलेल्या माजी आमदार व मुंबई महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते राजहंस सिंह यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या ठिकाणी पक्षाच्या आक्रमक महिला नेत्या चित्रा वाघ यांना संधी मिळण्याची चर्चा होती. उत्तर भारतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी सिंह यांना भाजपने संधी दिल्याची चर्चा आहे. महापालिका निवडणुकीत त्यांचा भाजपला लाभ होईल. नागपूरमधून राज्याचे माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना संधी देण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीत त्यांचे तिकीट कापल्याने पक्षाने आता त्यांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला आहे.
कोल्हापूरमध्ये गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांच्या विरोधात अमल महाडीक यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
अकोला- बुलढाणा- वाशिम मतदारसंघात वसंत खंडेलवाल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तिथे शिवसेनेचे गोपीकिशन बाजोरिया विद्यमान आमदार आहेत. धुळे-नंदुरबारमध्ये विद्यमान आमदार अमरिश पटेल यांना संधी मिळाली आहे. निवडणूक प्रक्रिया
२३ नोव्हेंबरला अर्ज दाखल केले जातील. २४ नोव्हेंबरला अर्जांची छाननी होईल. अर्ज मागे घेण्याची मुदत २६ नोव्हेंबर असून, १० डिसेंबर रोजी मतदान आणि १४ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.१ जानेवारी २०२२ ला आठ सदस्य निवृत्त होत आहेत.
रामदास कदम (शिवसेना) मुंबई, भाई जगताप ( काँग्रेस ) मुंबई, सतेज पाटील (काँग्रेस) कोल्हापूर ,
गिरिशचंद्र व्यास (भाजप) नागपूर,अरूण जगताप (राष्ट्रवादी) अहमदनगर,गोपीकिशन बजोरिया (शिवसेना) अकोला,
प्रशांत परिचारक (अपक्ष) सोलापूर , अमरिश पटेल (भाजप) धुळे- नंदुरबार, बुलढाणा यांचा समावेश आहे.
रिपोर्टर