Breaking News
व्हिजन फाऊंडेशन ऑफ इंडियाच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन महापौरांकडून एक लाख रुपयांची देणगी
मुंबई : लोकवार्ता टाइम्स
देशभरातील नेत्र रुग्णांना वैद्यकीय सेवा पुरविणा-या व्हिजन फाऊंडेशन ऑफ इंडिया या संस्थेच्या कार्याची दखल घेऊन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून संस्थेला एक लाख रुपयांची वैयक्तिक देणगी प्रदान केली आहे.
महापौर निवासस्थानी आज (दिनांक २४ डिसेंबर २०२१) ही घोषणा करण्यात आली. यावेळी महापौरांसह व्हिजन फाऊंडेशन ऑफ इंडियाचे संस्थापक तथा आंतरराष्ट्रीय स्तरावर नामांकित नेत्र तज्ज्ञ डॉ.कुलीन कोठारी आणि या भागीदारीसाठी समन्वय साधणारे महानगरपालिकेचे सहआयुक्त (महानगरपालिका आयुक्त) चंद्रशेखर चोरे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमाविषयी माहिती देताना महापौर किशोरी पेडणेकर याप्रसंगी म्हणाल्या की, उद्या वयाच्या ६० व्या वर्षात मी पदार्पण करित आहे. तसेच माझ्या सुपुत्राला पुत्ररत्न म्हणजेच मला नातूदेखील लाभला आहे. या दुहेरी आनंदातून जनतेसाठी व्हिजन फाऊंडेशन ऑफ इंडिया या विख्यात संस्थेला एक लाख रुपयांची वैयक्तिक देणगी सुपूर्द केली आहे. फाऊंडेशनचे संस्थापक डॉ.कुलीन कोठारी यांच्या कार्याविषयी मी परिचित आहे. १९९३ मध्ये स्थापन झालेल्या या फाऊंडेशनने भारतभरात अकरा लाख गरजू नेत्र रुग्णांवर आवश्यक त्या नेत्र शस्त्रक्रिया करण्याचा संकल्प स्थापनेवेळी सोडला होता. आजपर्यंत जवळपास १९ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेशातील मिळून सुमारे ५ लाख ६० हजारपेक्षा अधिक नेत्र रुग्णांवर या फाऊंडेशनने विनामूल्य शस्त्रक्रिया केल्या आहेत. ‘राष्ट्रीय नेत्र यज्ञ’ या नावाने चालविला जाणारा हा उपक्रम प्रेरणादायी आहे, असे महापौरांनी नमूद केले.
पुढे त्या म्हणाल्या की, ‘व्हिजन फाऊंडेशन ऑफ इंडिया’ च्या ‘राष्ट्रीय नेत्र यज्ञ’ उपक्रमाला हातभार लावण्यासाठी माझ्या ६० व्या वाढदिवस निमित्ताने भागीदारी केली आहे. जे गरजू रुग्ण मोतिबिंदू अथवा कमकुवत दृष्टीने ग्रस्त असतील किंवा अन्य नेत्र आजार असतील, अशा रुग्णांना महापौर या नात्याने फाऊंडेशनकडे संदर्भित केले जाईल. त्या रुग्णांची आवश्यक ती पूर्व तपासणी, शस्त्रक्रिया तसेच कॉन्टॅक्ट लेन्स् सारख्या साधनांची पूर्तता या सर्व बाबींचा खर्च व्हिजन फाऊंडेशन ऑफ इंडियाच्या सहयोगातून करण्यात येईल. त्यासाठी इतर आवश्यक ती मदत मी देखील करणार आहे, असे महापौरांनी सांगितले.
रिपोर्टर