Breaking News
वन अविघ्न पार्क इमारत आगीप्रकरणी दोषींवर कारवाई होणार – महापौर
- प्रशासकीय चौकशी करणार- महानगरपालिका आयुक्त
मुंबई : लोकवार्ता टाइम्स
करीरोड येथील महादेव पालव मार्गावर स्थित वन अविघ्न पार्क या बहुमजली इमारतीमध्ये आज शुक्रवारी दुपारी आग लागली. या आगीप्रकरणी रहिवाशांनी केलेल्या तक्रारीची योग्य दखल घेण्यात आली असून तथ्य आढळल्यास जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे प्रतिपादन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले. आगीच्या घटनेची संपूर्ण प्रशासकीय चौकशी करण्यात येईल. तसेच तक्रारीची पडताळणी करुन त्यात तथ्य आढळले तर संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल, असे महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी सांगितले.
शुक्रवारी दुपारी अविघ्न पार्क या बहुमजली इमारती आग लागल्याचे वृत्त समजताच नंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणकर, महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंग चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. संजीव कुमार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली तसेच यंत्रणेला आवश्यक ते निर्देश दिले.
घटनास्थळी आमदार अजय चौधरी, महानगरपालिकेचे स्थापत्य समिती (शहर) अध्यक्ष दत्ता पोंगडे, नगरसेविका सिंधू मसुरकर यांनीही भेट दिली. उपायुक्त (परिमंडळ २) हर्षद काळे, उपायुक्त (परिमंडळ १) विजय बालमवार, एफ/दक्षिण विभागाच्या सहाय्यक आयुक्त स्वप्नजा क्षीरसागर तसेच प्रमुख अग्निशमन अधिकारी हेमंत परब यांनी आपसात सर्व समन्वय राखून तसेच योग्यरितीने यंत्रणा कार्यान्वित करुन मदत कार्याला वेग दिला.
घटनास्थळी भेट दिल्यानंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्या म्हणाल्या की, वन अविघ्न पार्कमधील १९ व्या माळ्यावर आग लागल्यानंतर याठिकाणी फर्निचरचे काम करीत असलेल्या कर्मचाऱयांपैकी अरुण तिवारी नामक व्यक्तिने खिडकीतून बाहेर उडी मारुन जीव वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुर्दैवाने त्यांचा मृत्यू ओढवला. अग्निशमन दलाची वाहने येण्यापूर्वी इमारतीच्या सुरक्षा अथवा तत्सम कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखून मदत केली असती तर, कदाचित तिवारी यांचे प्राण वाचू शकले असते, असे महापौरांनी नमूद केले. पुढे त्या म्हणाल्या की, इमारतीतील रहिवाशांनी विकासकासंदर्भात तक्रार केली आहे की, सोसायटी रहिवाशांकडे हस्तांतरीत न केल्यामुळे बरीच कामे प्रलंबित असून यामुळे ही आगीची घटना घडल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या तक्रारीबाबत योग्य ती चौकशी करून प्रशासनाने आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश महापौरांनी यावेळी दिले.
याप्रसंगी प्रसारमाध्यमांशी बोलताना महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंग चहल म्हणाले की, आग पूर्णपणे विझली असल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. सद्यस्थितीत धूर येत असल्यामुळे पुन्हा आग लागू नये म्हणून अग्निशमन दल योग्य ती खबरदारी घेत आहे. त्याचप्रमाणे इमारतीतील रहिवाशांनी केलेल्या तक्रारीनुसार, या इमारती संदर्भात तसेच आगीबाबत प्रशासकीय चौकशी करून योग्य कारवाई करण्यात येईल, असे महानगरपालिका आयुक्तांनी नमूद केले.
दरम्यान, सायंकाळी उशिरा प्राप्त झालेल्या प्रथमदर्शनी माहितीनुसार, वन अविघ्न पार्क इमारतीतील आगीप्रसंगी जीव वाचविण्याच्या प्रयत्नात, १९ व्या मजल्यावरुन खिडकीतून बाहेर निघताना खाली कोसळून ज्या व्यक्तिचा मृत्यू ओढवला, त्यांचे नाव अरुण तिवारी असे असल्याचे समजते. तसेच सदर व्यक्ती या इमारतीत सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. या संदर्भात आवश्यक ती पडताळणी व खात्री करण्याची कार्यवाही सायंकाळी उशिरापर्यंत सुरु होती.
रिपोर्टर