Breaking News
केशवराव खाड्ये मार्गावरील रेल्वे उड्डाणपुलाच्या पहिल्या टप्प्यातील बांधकामाचा मार्ग मोकळा
- सोळा अतिक्रमणे हटवली
मुंबई : लोकवार्ता टाइम्स
मुंबई महानगरपालिकेमार्फत केशवराव खाड्ये मार्गावर महालक्ष्मी रेल्वे स्थानकाजवळ, रेल्वेमार्गावर उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. या पुलाच्या बांधकामामध्ये बाधित होत असलेल्या ४८ पैकी १६ बांधकामे पहिल्या टप्प्यात काढण्यात आली. यामुळे उड्डाणपुलाच्या पहिल्या टप्प्यातील बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे.
महानगरपालिकेमार्फत संत गाडगे महाराज चौक (सातरस्ता) येथून केशवराव खाड्ये मार्गावर हाजी अलीच्या दिशेने केबल स्टेअड पद्धतीने पूल बांधण्यात येणार आहे. हा पूल सध्याच्या महालक्ष्मी पुलावरील वाहतूक कमी करण्यासाठी मदतकारक ठरणार आहे. तसेच सध्या काम सुरु असलेल्या सागरी किनारा रस्तावरुन येणारी आणि दक्षिण मध्य मुंबईकडे जाणारी वाहतुकही सुरळीत होणार आहे.
हा उड्डाणपूल महालक्ष्मी रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेमार्गावर बांधण्यात येणार आहे. या उड्डाणपुलाच्या बांधकामामध्ये ‘ई’ विभागातील एकूण ४८ बांधकामे बाधित होत आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील १६ बांधकामांचे निष्कासन सोमवारी 'ई' विभाग कार्यालयामार्फत करण्यात आले. निष्कासन करण्यात आलेल्या पात्र झोपडीधारकांचे 'ई' विभाग कार्यालयामार्फत कायदेशीररित्या पुनर्वसन देखील करण्यात आले आहे. ही सोळा अतिक्रमणे काढल्यामुळे उड्डाणपुलाच्या पहिल्या टप्प्यातील बांधकामाचा मार्ग मोकळा झालेला आहे. पुढील अतिक्रमणे काढण्यासाठी, बाधितांचे पुनर्वसन करण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात असून येत्या काही दिवसांत ती पूर्ण करुन उर्वरित अतिक्रमणे देखील हटविण्यात येणार आहे.
उपायुक्त (परिमंडळ १) विजय बालमवार, 'ई ' विभागाचे सहाय्यक आयुक्त मनीष वळंजू यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता शफी मोमीन, सहाय्यक अभियंता दीपक झुंजारे, दुय्यम अभियंता प्रवीण मुळूक, कनिष्ठ अभियंता दीनानाथ पालवी यांनी ही अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही पार पाडली. आग्रीपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कोरगांवकर आणि त्यांच्या सहका-यांनी पोलीस बंदोबस्त पुरवला.
रिपोर्टर