Breaking News
गिरणी कामगारांना कागदपत्रे सादर करण्यासाठी ३० नोव्हेंबर पर्यंत अंतिम मुदतवाढ
मुंबई : लोकवार्ता टाइम्स
मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळातर्फे ०१ मार्च, २०२० रोजी काढण्यात आलेल्या सदनिका सोडतीतील यशस्वी गिरणी कामगार/ वारस यांना मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी ३० नोव्हेंबर, २०२१ पर्यंत १५ दिवसांची अंतिम मुदतवाढ देण्यात आली असल्याचे म्हाडामार्फत सांगण्यात आले.
मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी सर्व संबंधित गिरणी कामगार/ वारस यांना आवाहन केले आहे की पात्रता निश्चितीकरिता बँकेमध्ये कागदपत्रे सादर करण्याची ३० नोव्हेंबर , २०२१ ही शेवटची संधी आहे तसेच मंडळातर्फे यासंदर्भात यापुढे कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नसल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले.
मुंबई मंडळातर्फे गिरणी कामगार/ वारसांसाठी बॉम्बे डाईंग मिल, बॉम्बे डाईंग स्प्रिंग मिल व श्रीनिवास मिलच्या जागांवर उभारण्यात आलेल्या ३ हजार ८९४ सदनिकांची संगणकीय सोडत १ मार्च , २०२० रोजी काढण्यात आली होती. प्रचलित प्रणालीनुसार सोडतीतील यशस्वी गिरणी कामगार/ वारस यांनी अर्जात नमूद केलेल्या पत्त्यावर मंडळातर्फे प्रथम सूचना पत्र (First Intimation Letter) पोस्टाद्वारे पाठवण्यात आली आहेत. या सूचना पत्रामध्ये नमूद कागदपत्रे अर्जदारांनी मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मुंबई स्थित शाखांमध्ये सादर करण्यासाठी १२ जुलै, २०२१ ते ०९ सप्टेंबर, २०२१ पर्यंत ६० दिवसांचा कालावधी देण्यात आला होता. परंतु या दरम्यान अर्जदारांचा मिळालेला अल्प प्रतिसाद लक्षात घेता मंडळाने दुसऱ्यांदा १० सप्टेंबर, २०२१ ते ०९ ऑक्टोबर, २०२१ या कालावधीत कागदपत्रे सादर करण्यासाठी मुदतवाढ दिली होती. तथापि या कालावधीत देखील बहुतांश गिरणी कामगार / वारस यांनी कागदपत्र सादर केली नसल्यामुळे सदरची तिसरी मुदतवाढ देण्यात आली आहे.
या व्यतिरिक्त मुंबई मंडळातर्फे यशस्वी गिरणी कामगार/ वारस यांना पाठविण्यात आलेली प्रथम सुचना पत्र विविध कारणांमुळे पोस्टामधून मुंबई मंडळाच्या कार्यालयात परत प्राप्त झाली आहेत. पोस्टाकडून परत आलेल्या प्रथम सूचना पत्रांची यादी म्हाडाचे अधिकृत संकेतस्थळ https://mhada.gov.in वर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर मंडळातर्फे सर्व संबंधितांना आवाहन करण्यात येत आहे की, विविध कारणांमुळे पोस्टाकडून परत प्राप्त झालेली सूचना पत्र मुंबईतील वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयातील उपमुख्य अधिकारी, गिरणी कामगार कक्ष, मुंबई मंडळ, कक्ष क्रमांक २०५, पहिला मजला या कार्यालयात जमा करण्यात आली असून सर्व संबंधित यशस्वी अर्जदारांनी आपली प्रथम सूचना पत्र घेऊन जावीत व लवकरात लवकर पात्रता निश्चितीकरिता कागदपत्रे मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुंबईस्थित शाखांमध्ये ३० नोव्हेंबर, २०२१ पूर्वी सादर करावीत, असे आवाहन देखील म्हाडामार्फत करण्यात आले आहे.
रिपोर्टर