Breaking News
आरे कॉलनीत मानवी वस्तीत सापडला बिबट्याचा बछडा
अनधिकृत बांधकामांमुळे जंगल नष्ट होत असल्याने मानवी वस्तीत प्राण्यांचा वावर वाढला
मुंबई : लोकवार्ता टाइम्स
गोरेगाव पूर्व येथील आरे कॉलनीमध्ये मंगळवारी बिबट्याचा बछडा मानवी वस्तीमध्ये आढळून आला. आरेमधील युनिट क्रमांक २२ येथून बिबट्याचा बछडा रेस्क्यू करण्यात आला. बछड्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून त्याच्या आईचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. अनधिकृत बांधकामांमुळे, जंगल नष्ट होत असल्याने मानवी वस्तीत प्राण्यांचा वावर वाढला आहे. गेल्या काही दिवसांत बिबट्याचा मानवी वस्तीत वावर वाढल्याने परीसरामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
वसाहतीमधील कुलाबा- वांद्रे- सीप्झ या मेट्रो-३ चे कारशेड रद्द करण्यात आले आहे. या कारशेडला लागून असलेल्या वसाहत क्रमांक २२ येथील तपेश्वर मंदिराजवळ आरेमधील स्थानिक मुलांना बिबट्याचे पिल्लू आढळून आले. दगडाच्या मागे बसलेले पिल्लू ओरडत असल्याने त्या परिसरातून जाणाऱ्या मुलांना त्याचा आवाज आला. मुलांनी त्याठिकाणी जाऊन पाहणी केल्यावर ते पावसामुळे भिजले होते आणि त्यावेळी जोरदार पाऊस देखील पडत होता. म्हणून या मुलांनी बछड्याला ताब्यात घेऊन पोलीसांना याची माहिती दिली. पोलिसांनी वन विभागाला कळवल्यानंतर घटनास्थळी ठाणे वन विभागाचे कर्मचारी दाखल झाले. पावसाच्या अंदाज घेऊन आज रात्री या पिल्लाची त्याच्या आईबरोबर भेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला जाईल. हे पिल्लू साधारण ३ ते ४ महिन्यांचे असल्याचे सांगण्यात येत आहे.
आरे परिसरात अनधिकृत बांधकामे वाढल्याने जंगल नष्ट झाले आहे. त्यामुळे जंगली प्राणी मानव वस्तीत शिरत आहेत. या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे. काल सोमवारी रात्री युनिट ३१ मधील घरात बिबट्या भक्ष्याच्या शोधात चक्क घरात घुसला. यापूर्वीच्या घटनेत एक महिला देखील बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाली होती. महिन्याभरात दोन जणांवर हल्ला झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. हल्ल्यांशिवाय बिबट्याचा आसपासच्या मानवी वस्तीत वावर असल्याचे अनेकदा निदर्शनास आले आहे.
रिपोर्टर