Breaking News
मधुमेह टाळण्यासाठी आरोग्यपूर्ण जीवनशैलीचा अंगिकार करा – अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी
- ३० वर्षावरील नागरिकांनी वर्षातून किमान एकदा मधुमेह चाचणी करण्याचे आवाहन
मुंबई : लोकवार्ता टाइम्स
“मधुमेह टाळण्यासाठी आरोग्यपूर्ण जीवनशैलीचा अंगिकार करा. यामध्ये प्रामुख्याने नियमित व वेळेवर सुयोग्य आहार घेणे, मार्गदर्शकांच्या सल्ल्यानुसार दररोज ठरलेल्या वेळी व्यायाम करणे, पायी चालणे, सायकल चालविणे यासह पुरेशी झोप घेणे, यासारख्या बाबींचा समावेश वैद्यकीय सल्ल्यानुसार करावा. त्याचबरोबर ३० वर्षावरील सर्वांनी वर्षातून किमान एकदा आपली मधुमेह चाचणी करवून घ्यावी”, असे मार्गदर्शन बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांनी आज केले. ते आज जागतिक मधुमेह दिनानिमित्त आयोजित एका विशेष कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
या कार्यक्रमा दरम्यान मधुमेह विषयक जनजागृतीपर एका विशेष भित्तीपत्रकाचे प्रकाशन सुरेश काकाणी यांच्या हस्ते करण्यात आले. महानगरपालिका मुख्यालयात आयोजित या कार्यक्रमाला उप आयुक्त (सार्वजनिक आरोग्य) संजय कु-हाडे, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे, उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी, उप कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांच्यासह प्रसारमाध्यम प्रतिनिधी आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध खात्यातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान उपस्थितांना मार्गदर्शन करताना अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, असंसर्गजन्य आजार नियंत्रणावर विशेष भर देऊन प्राथमिक आरोग्य सेवा अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. ‘कोविड - १९’ या संसर्गजन्य आजारामुळे होणार्या मृत्युंकरिता मधुमेह हा एक महत्त्वाचा जोखमीचा घटक असून नागरिकांनी वेळेत मधुमेहाचे निदान, रक्तातील साखरेचे नियंत्रित प्रमाण व जीवनशैलीतील बदल या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. मधुमेही रुग्णांचे ‘कोविड - १९’ लसीकरण झाल्याची खात्री करणे आवश्यक आहे.
जागतिक मधुमेह दिनानिमित्त आयोजित उपस्थितांशी संवाद साधताना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ.मंगला गोमारे यांनी आवाहन केले की, महापालिका दवाखान्यांमार्फत पुरविण्यात येणार्या आरोग्य सुविधांचा लाभ जास्तीत-जास्त मुंबईकरांनी घ्यावा. तसेच ३० वर्षांपेक्षा अधिक वय असणार्या सर्व व्यक्तिंनी वर्षातून किमान एकदा मधुमेह व उच्च रक्तदाबाकरिता आपली तपासणी करून घ्यावी. त्याचबरोबर सर्व कॉर्पोरेट कार्यालये आणि कामाची ठिकाणे यांनी आपल्या अधिनस्त कर्मचार्यांची मधुमेह व उच्च रक्तदाब यांकरिता तपासणी नियमितपणे करावी. तसेच कार्यालयीन कार्यक्षेत्रात प्रतिबंधात्मक व आरोग्यपूर्ण जीवनशैलीचा प्रसार करावा, असेही डॉ. गोमारे यांनी आवर्जून नमूद केले.
या कार्यक्रमादरम्यान बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नायर रुग्णालयातील आहार तज्ज्ञ श्रीमती जयश्री परांजपे आणि के. ई. एम. रुग्णालयातील आहार तज्ज्ञ सफला महाडिक यांनी संगणकीय सादरीकरणासह दैनंदिन जीवनातील आरोग्यपूर्ण आहार कसा असावा, आपल्या आहारामध्ये कोणत्या बाबी असाव्यात व कोणत्या बाबी टाळाव्यात, याबाबत उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देखील दिली.
याच कार्यक्रमादरम्यान उप कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह यांनी सांगितले की, महापालिका दवाखान्यांमध्ये उपचार घेणार्या मधुमेह आणि उच्च रक्तदाबच्या रुग्णांकरिता भारतीय आहारतज्ञ संघटनेच्या मदतीने आहारतज्ञांमार्फत समुपदेशन सेवा प्रदान करण्यास दिनांक १ नोव्हेंबर २०२१ पासून प्रारंभ करण्यात आला आहे. तसेच कुटुंब, शाळा आणि महाविद्यालयांतून सकस आहारविषयक सवयींस प्रोत्साहन देण्याबाबत देखील मार्गदर्शन शिबीरांचे आयोजन करण्यात येत आहे. आज आयोजित या विशेष कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व कार्यक्रमाच्या अखेरीस आभार प्रदर्शन हे डॉ. दक्षा शहा यांनी केले.
जागतिक मधुमेह दिनानिमित्त आज बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात प्रामुख्याने महानगरपालिका कर्मचा-यांसाठी आणि बृहन्मुंबई महानगरपालिका विषयक घडामोडींचे वार्तांकन करणा-या प्रसारमाध्यम प्रतिनिधींसाठी मधुमेह व रक्तदाब चाचणी शिबीराचे आयोजन देखील करण्यात आले होते. तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेची विविध रुग्णालये, दवाखाने, कार्यालये इत्यादी ठिकाणी देखील मधुमेह चाचणी करण्यात आली, अशीही माहिती सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे देण्यात आली आहे.
रिपोर्टर