Breaking News
परळ परिसरतील काही भागात ५, ६ ऑक्टोबर रोजी पाणी पुरवठा बंद
जलवाहिन्यांच्या बदलाच्या तांत्रिक कामामुळे पाणी पुरवठा बंद
मुंबई : लोकवार्ता टाइम्स
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘एफ दक्षिण’ विभागातील परळ, काळेवाडी, नायगांव इत्यादी परिसरातील पाणीपुरवठा अधिक सुव्यवस्थित करण्याकरिता काही तांत्रिक कामे हाती घेतली जाणार आहेत. ही कामे योग्यप्रकारे होण्याच्या दृष्टीने मंगळवार, दिनांक ५ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी १० वाजेपासून बुधवार, दिनांक ६ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी १० वाजेपर्यंत सदर परिसरातील पाणीपुरवठा २४ तासांसाठी खंडित करण्यात येणार आहे. या कालावधीत गोलंजी टेकडी जलाशयाच्या आतील परिसरातील ७५० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीचे व ४५० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीची जोडणी करण्यात येणार असून ४५० मिलीमीटर व्यासाच्या २ जलवाहिन्या निष्कासित करण्यात येणार आहेत. ही बाब लक्षात घेता, पाणीपुरवठा खंडित करण्यात येणा-या परिसरातील रहिवाशांनी पाणी जपून आणि काळजीपूर्वक वापरावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाद्वारे करण्यात येत आहे.
परळ गांव येथील गं. द. आंबेकर मार्ग ५० टेनामेंटपर्यंत, एकनाथ घाडी मार्ग, परळ गांव मार्ग, नानाभाई परळकर मार्ग, भगवंतराव परळकर मार्ग, विजयकुमार वाळिंभे मार्ग, एस. पी. कंपाऊंड या परिसरांना दररोज दुपारी १.४५ ते सायंकाळी ४.४५ या कालावधी दरम्यान पाणीपुरवठा करण्यात येतो. तथापि, दिनांक ५ ऑक्टोबर २०२१ रोजी हा पाणीपुरवठा करण्यात येणार नाही.
काळेवाडी येथील परशुराम नगर, जिजामाता नगर, आंबेवाडी (भाग) साईबाबा मार्ग, मिंट वसाहत, राम टेकडी या परिसरांना दररोज रात्री ८.३० ते ११.३० वाजेपर्यंत पाणीपुरवठा करण्यात येतो. तथापि, ५ ऑक्टोबर २०२१ रोजी हा पाणीपुरवठा करण्यात येणार नाही.
नायगांव येथील जेरबाई वाडिया मार्ग, स्प्रींग मिल चाळ, गं. द. आंबेकर मार्ग, गोविंदजी केणी मार्ग, शेट्ये बाजार, भोईवाडा गांव आणि हाफकिन या परिसरांना दररोज सकाळी ७.०० ते १०.०० वाजेपर्यंत पाणीपुरवठा करण्यात येतो. तथापि, ६ ऑक्टोबर २०२१ रोजी हा पाणीपुरवठा करण्यात येणार नाही, असे महापालिकेच्यावतीने सांगण्यात आले आहे.
तरी संबंधीत परिसरातील नागरिकांना बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाद्वारे आवाहन करण्यात येते की, त्यांनी आदल्या दिवशी पुरेसा पाणीसाठा करुन ठेवावा. तसेच पाण्याचा काटकसरीने वापर करावा. सदर कामाच्या कालावधीमध्ये महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, अशी विनंती महापालिकेने केली आहे.
रिपोर्टर