Breaking News
राज्यातील चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे २२ ऑक्टोबरपासून सुरू होणार
- पन्नास टक्के प्रेक्षकांनाच मिळणार प्रवेश
- नवी नियमावली जाहीर
मुंबई : लोकवार्ता टाइम्स
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे पुन्हा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता, मात्र आता लोकांचे मनोरंजन पुन्हा सुरू होणार आहे. अखेर २२ ऑक्टोबरपासून राज्यातील सर्व नाट्यगृहे आणि चित्रपटगृहे उघडण्याचा आणि इतर महत्त्वाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी देण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने आज घेतला. पर्यटन व सांस्कृतीक कार्य विभागातर्फे आज परिपत्रक (जीआर) जाहीर करण्यात आले. यामध्ये नवीन नियमावलीही जाहीर करण्यात आली आहे. पन्नास टक्के प्रेक्षकांनाच प्रवेश मिळणार आहे.
'ब्रेक द चेन’अंतर्गत नाट्यगृहे आणि चित्रपटगृहे उघडण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला असून राज्य सरकारच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागाने त्यासाठी नवी नियमावली जाहीर केली आहे. या नव्या नियमावलीनुसार, प्रतिबंधित क्षेत्रातील नाट्यगृहे सुरू करण्यास परवानगी नाही. तसेच मास्क आणि सॅनिटासझरचा वापर बंधनकारक आहे. कलाकार आणि कर्मचाऱ्यांनी नियमित तपासणी करणे बंधनकारक आहे. आसन व्यवस्थेत सुरक्षित अंतर ठेवणे बंधनकारक आहे. तसेच पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक क्षमतेचा वापर करण्याची परवानगी नसणार आहे. सर्वांना आरोग्य सेतू ॲपचा वापर बंधनकारक आहे. कलाकार आणि प्रेक्षक सर्वांचे लसीकरण पूर्ण असणे बंधनकारक आहे. कलाकारांना कक्षात जाऊन भेटण्याची परवानगी नाही. केशभूषा आणि रंगभूषा करणाऱ्यांनी पीपीई कीट परिधान करणे बंधनकारक आहे. या नियमांचे पालन करणे सर्वांसाठीच बंधनकारक आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाईचा इशारादेखील देण्यात आला आहे.
पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागातर्फे आज मंगळवारी जाहीर केलेले परिपत्रक
रिपोर्टर