Breaking News
विषाणूच्या नव्या प्रकारावर लस किती प्रभावी याचा अभ्यास सुरू- अदर पूनावाला
मुंबई : लोकवार्ता टाइम्स
ओमिक्रॉन व्हेरिएंटचा वेगाने फैलाव होत असल्याने जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे कोविड- १९ वरील उपलब्ध लसपैकी कोणती लस यावर सर्वात प्रभावी ठरू शकते, याची चाचपणी सुरू झाली आहे. सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांनी याबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे. ओमिक्रॉनचा प्रतिकार करण्यात कोव्हिशील्ड लस किती प्रभावकारी ठरू शकते, हे येत्या दोन ते तीन आठवड्यात स्पष्ट होईल. ओमिक्रॉन अधिक घातक आहे की नाही, हे आताच सांगता येणार नाही. त्यात बूस्टर डोस हा आपल्यापुढे पर्याय आहे. असे असले तरी सरकारचे लक्ष हे सर्वांना कोविड -१९ वरील लसचे दोन्ही डोस देण्यावर आणि लसीकरण पूर्ण करण्यावरच असला पाहिजे, असेही पूनावाला यांनी स्पष्ट केले.
ऑक्सफोर्डचे शास्त्रज्ञ यावर अधिक संशोधन करत आहेत. ते निष्कार्षापर्यंत पोहचल्यावर आम्ही नवीन लसची निर्मिती करू शकतो. येणाऱ्या सहा महिन्यांत ही लस बूस्टर डोससाठी उपलब्ध करता येऊ शकते, असे पूनावाला यांनी नमूद केले. काळानुसार कोव्हिशील्डची प्रतिकारक क्षमता कमी होईल, असे म्हणता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. बूस्टर डोस देण्याबाबत केंद्र सरकारने निर्णय घेतला तर लसचा मुबलक साठा उपलब्ध करून देण्यास आम्ही तयार आहोत. तज्ज्ञांच्या सल्ल्याने हा डोस दिला जाऊ शकतो. ही लस सहाशे रुपयांपर्यंत मिळू शकते, असेही पूनावाला यांनी स्पष्ट केले.
लसचा मोठा साठा कंपनीकडे उपलब्ध आहे. राज्यांसाठी आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी आम्ही २५ कोटी डोस राखीव ठेवले आहेत. अशावेळी सरकारने बूस्टर डोस देण्याची घोषणा केल्यास आम्ही त्यासाठी तयार आहोत, असे नमूद करताना कोव्होव्हॅक्सबाबत महत्त्वाचे अपडेट्स पूनावाला यांनी दिले. कोव्होव्हॅक्स या लसचा भरपूर साठा आमच्याकडे आहे. कोविडवरील ही स्वदेशी लस आहे. पुढील काही आठवड्यांत या लसच्या वापराला परवानगी मिळणार आहे. जानेवारी- फेब्रुवारीपर्यंत ही लस भारतात उपलब्ध होईल, असे पूनावाला म्हणाले. कोव्हिशील्डच्या किमतीत कोणताही बदल केला जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले. पूनावाला एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलत होते.
रिपोर्टर