Breaking News
महापरिनिर्वाण दिनी ‘ग्लोबल पॅगोडा’ येथे न येण्याबाबत ग्लोबल पॅगोडा प्रतिनिधी आणि महानगरपालिकेचे आवाहन
- ५ ते ७ डिसेंबर दरम्यान पॅगोडा बंद
मुंबई : लोकवार्ता टाइम्स
दरवर्षी ६ डिसेंबर रोजी महानगरपालिकेच्या ‘आर मध्य’ विभागाच्या कार्यक्षेत्रात असणा-या ‘ग्लोबल पॅगोडा’, गोराई येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने अनुयायी येत असतात. मात्र, कोविड- १९ या संसर्गजन्य आजाराच्या प्रादुर्भावाची संभाव्यता लक्षात घेता, खबरदारीची उपाययोजना म्हणून ५ ते ७ डिसेंबर २०२१ दरम्यान ग्लोबल पॅगोडा बंद ठेवण्यात येणार आहे. तरी, अनुयायांनी दिनांक ५ ते ७ डिसेंबर २०२१ दरम्यान ग्लोबल पॅगोडा येथे येऊ नये आणि कोरोना संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांना सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका उप आयुक्त (परिमंडळ - ७) डॉ. भाग्यश्री कापसे आणि ग्लोबल पॅगोडाचे प्रतिनिधी यांनी संयुक्तपणे केले आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनाच्या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आर मध्य विभाग कार्यालयात विविध संघटनांसमवेत एका विशेष बैठकीचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. उप आयुक्त (परिमंडळ - ७) डॉ.भाग्यश्री कापसे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या बैठकीला ‘आर मध्य’ विभागाचे सहाय्यक आयुक्त हफीज वकार जावेद मन्सुर अली, ग्लोबल पॅगोडाचे व्यवस्थापक एस.एस.शिंदे संबंधीत पोलिस निरिक्षक रविंद्र आव्हाड, पोलिस उप निरिक्षक (वाहतूक) संजय सावंत, विभागाचे कार्यकारी अभियंता निवृत्ती गोंधळी यांच्यासह महापालिकेचे संबंधीत अधिकारी आणि ग्लोबल पॅगोडाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
बैठकीदरम्यान कोविड- १९ चा प्रादुर्भाव लक्षात घेता खबरदारीची उपाययोजना म्हणून यावर्षी रविवार ५ डिसेंबर २०२१ ते मंगळवार, दिनांक ७ डिसेंबर २०२१ या तीन दिवसांच्या कालावधी दरम्यान ‘ग्लोबल पॅगोडा’ बंद ठेवण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे. तरी, कृपया अनुयायांनी या तीन दिवसांदरम्यान ‘ग्लोबल पॅगोडा’ येथे प्रत्यक्ष न येता, आपापल्या घरुनच अभिवादन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
रिपोर्टर