Breaking News
विदेशात जाणाऱ्यांना ८४ दिवसांऐवजी २८ दिवसानंतर घेता येणार कोविशील्ड लशीचा दुसरा डोस
मुंबई : लोकवार्ता टाइम्स
पर्यटन अथवा इतर कारणांसाठी विदेशात जाऊ इच्छिणारे नागरिक तसेच शासकीय आणि खासगी आस्थापनेवर कार्यरत कर्मचाऱ्यांना कोविशील्ड लशीचा दुसरा डोस ८४ दिवसांऐवजी २८ दिवसानंतर घेता येईल. या अनुषंगाने महानगरपालिका प्रशासनाने अतिरिक्त मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. विदेशात शैक्षणिक, नोकरी - व्यवसाय आणि ऑलिपिंक क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांना कोविशील्ड लशीचा पहिला डोस घेतल्यानंतर ८४ दिवसांऐवजी २८ दिवसांच्या अंतराने दुसरा डोस देण्याचे निर्देश यापूर्वी देण्यात आले होते.
तसेच वैद्यकीय उपचार किंवा अपरिहार्य कारणांनी विदेशात जाणे आवश्यक असलेल्या व आपल्या प्रांतात परत जाण्यासाठी परदेश गमन करणे अनिवार्य असलेल्या नागरिकांना देखील ही सवलत देण्यात आली होती. पर्यटन आणि इतर कारणांसाठी विदेशात जाण्यास इच्छुक नागरिकांकडून देखील कोविशील्ड लशीचा पहिला डोस घेतल्यानंतर ८४ ऐवजी २८ दिवसानंतर दुसरा डोस घेण्याची मुभा मिळावी, ही मागणी सातत्याने करण्यात येत होती. तसेच ब्रेक द चेन अंतर्गत मार्गदर्शक सुचनांनुसार शासकीय आणि खासगी आस्थापना पूर्ण क्षमतेने सुरु झाल्या आहेत. या आस्थापनांवर कार्यरत कर्मचाऱ्यांना देखील कोविशील्डचा दुसरा डोस २८ दिवसानंतर मिळण्याबाबत सातत्याने मागणी करण्यात येत होती. या मागणीची दखल घेऊन महानगरपालिका प्रशासनाने कोविड लसीकरण संदर्भातील सुधारित अतिरिक्त मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. त्यानुसार पर्यटन अथवा इतर कारणांसाठी विदेशात जाऊ इच्छिणारे नागरिक तसेच शासकीय आणि खासगी आस्थापनेवर कार्यरत कर्मचाऱ्यांना कोविशील्ड लशीचा दुसरा डोस ८४ दिवसांऐवजी २८ दिवसानंतर घेता येईल.
या सवलतीचा लाभ घेताना १८ वर्ष व अधिक वयोगटातील नागरिकांकडे वैध पारपत्र (पासपोर्ट) असणे आवश्यक आहे. तसेच अशा नागरिकांना लस दिल्यानंतर लस प्रमाणपत्रात पारपत्राचा क्रमांक अंतर्भूत केला जाईल. पहिली मात्रा घेताना पारपत्र पुरावा म्हणून घेतला नसेल तरी संबंधीत लसीकरण अधिकाऱ्यांनी त्याचा आग्रह न करता वेगळे लस प्रमाणपत्र देण्याच्या सूचना देखील करण्यात आल्या आहेत. शासकीय आणि खासगी आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांना लस घेताना वैध ओळखपत्र सादर करणे आवश्यक असेल. लसीकरण केंद्रांवरील समन्वय अधिकारी (नोडल अधिकारी) लाभार्थ्यांकडून विहित नमुन्यात अर्ज भरुन घेतल्यानंतर तो प्रमाणित करुन कोविन प्रणालीवर अपलोड करतील. जागतिक आरोग्य संघटनेने कोविशाल्ड लस आपत्कालीन वापरासाठी मान्य केली आहे. त्यामुळे लस प्रमाणपत्र कोविशील्ड लशीचा उल्लेख हा आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी पुरेसा आहे.
रिपोर्टर