Breaking News
जोगेश्वरी पूर्वमध्ये मनोरंजनासह प्राचीन सांस्कृतिक माहिती देणारे अनोखे शिल्पग्राम उद्यान सर्वांसाठी खुले
- बारा बलुतेदार पद्धती, प्राचीन कला आणि खेळ यांची शिल्प, संगीत कारंजे, सांगीतिक जॉगिंग ट्रॅक, खुला रंगमंच यामुळे उद्यानाच्या लोकप्रियतेत वाढ
मुंबई : लोकवार्ता टाइम्स
धावपळीच्या जीवनामध्ये निवांतपणा आणि विरंगुळा शोधण्यासाठी येणाऱ्या नागरिकांचे मनोरंजन करण्यासह त्यांना प्राचीन संस्कृतीचे दर्शनही घडविण्याची किमया बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने साधली आहे ती जोगेश्वरी (पूर्व) स्थित मातोश्री मीनाताई ठाकरे शिल्पग्राममध्ये. बारा बलुतेदार कार्य पद्धती, प्राचीन खेळ, कला अशी विविधांगी सांस्कृतिक माहिती देणारे हरित केंद्र म्हणून शिल्प ग्रामची ओळख बनली आहे.
जोगेश्वरी (पूर्व) येथे जोगेश्वरी विक्रोळी जोड मार्गावर पुनम नगर परिसरात तब्बल ५५ हजार चौरस मीटर क्षेत्रावर मातोश्री मीनाताई ठाकरे शिल्पग्राम हे उद्यान फुलले आहे. मात्र ते निव्वळ उद्यान नाही तर सांस्कृतिक वारसा उलगडून दाखवणारे हरित केंद्र देखील आहे. या ठिकाणी बारा बलुतेदार, प्राचीन खेळ, नृत्य यांची शिल्प आहेत. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या प्राचीन संस्कृतीचे दर्शन घडविणारे बारा बलुतेदार यांची घरे, त्यांच्या कामाचे स्वरूप, प्राचीन खेळ आणि नृत्य परंपरा यांची शिल्प पाहताना मुले आणि वडीलधारी देखील हरखून जातात. इतिहासातील माहिती शिल्प रूपामध्ये पाहून मुलांना सांस्कृतिक आकलन करणे सहज सोपे तर ठरतेच, समवेत विरंगुळ्यातून शिक्षण देखील मिळते.
शिल्प ग्राममध्ये खुला रंगमंच (एम्फीथिएटर) देखील तयार करण्यात आला आहे. संगीत, नृत्य, मुक्त संवाद, चर्चासत्र, सभा इत्यादी विविध कार्यक्रमांसाठी किमान ५०० व्यक्ती बसू शकतील, इतक्या क्षमतेचा हा खुला रंगमंच आहे. या उद्यानात आकर्षक हिरवळ आणि वृक्षवेली आहेत. हिरवळीसोबत विविध प्रजातीचे वृक्ष, वेली, झुडपे ठिकठिकाणी असल्याने सदर उद्यानाच्या सौंदर्यात ती भर घालतात. संगीतमय कारंजे आणि सांगीतिक पदपथ हे आणखी महत्वाचे आकर्षण या ठिकाणी आहे. सांगीतिक तालावर विविध रंगांमध्ये उसळणारे कारंजे अबाल वृद्धांना आनंद देतात. शिल्पग्राम मधील विस्तीर्ण परिसरात फिरताना विविध ठिकाणे जोडणारे सांगीतिक पदपथ (म्युझिकल वॉकिंग ट्रॅक्स) आणि आकर्षक पायवाटा बांधण्यात आल्या आहेत. संगीत श्रवण करताना हिरवळीवर चालणे आणि सोबत उद्यानातील शिल्प पाहणे हा आगळावेगळा अनुभव ठरतो.
शिल्पग्राममध्ये ठिकठिकाणी आसनव्यवस्था आहे. उद्यानाच्या सौंदर्यात भर घालणारे वेगवेगळ्या आकाराचे गझेबो आसन व्यवस्थेसह संपूर्ण उद्यानाचे मनोहारी दृश्य पाहता येईल, अशारितीने बनविण्यात आले आहेत. लहान मुलांना खेळण्यासाठी स्वतंत्र जागेत विविध साहित्य लावण्यात आले आहे.
शिल्पग्राम उद्यान सकाळी ६ ते १० आणि दुपारी ४ ते रात्री ८ दरम्यान नागरिकांकरिता खुले असते. दर बुधवारी नियमित परिरक्षणाकरिता ते बंद असते. रविवार आणि इतर सार्वजनिक सुट्टीदरम्यान नागरिक शिल्पग्रामला भेट देऊन आनंद लुटू शकतात.
हे उद्यान पाहण्याकरिता प्रवेश शुल्क आकारले जाते. ३ ते १२ वर्षे या वयोगटातील लहान मुलांकरिता प्रत्येकी ५ रुपये आणि १२ वर्षे पेक्षा अधिक वयाच्या व्यक्तीसाठी प्रत्येकी २५ रुपये आकारले जातात. असे असले तरी दोन प्रौढ आणि दोन लहान मुले अशा चौघांच्या एका कुटुंबासाठी (आई, वडील आणि १२ वर्षांखालील दोन मुले) यांना मिळून फक्त २५ रुपये आकारण्यात येतात. शिल्पग्रामला दररोज सुमारे १५०० ते २ हजार नागरिक भेट देतात, अशी माहिती उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली आहे.
विविध चित्रपटांच्या, मालिकांच्या चित्रीकरणासाठी देखील शिल्पग्रामला सातत्याने मागणी असते. त्यासाठी देखील सशुल्क आकारणी करून परवानगी दिली जाते. एकूणच, शिल्पग्रामची लोकप्रियता सातत्याने वाढते आहे.
रिपोर्टर