Breaking News
मुंबईत आजपासून १८ वर्षांवरील सर्वांना सर्व केंद्रांवर विनामूल्य लस
मुंबई : लोकवार्ता टाइम्स
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव प्रीत्यर्थ आणि केंद्र सरकारच्या निर्देशानुसार देशात ७५ दिवसांसाठी 'कोविड लस अमृत महोत्सव' राबविण्यात येणार आहे. मुंबई महानगरात देखील उद्या दिनांक १५ जुलै २०२२ पासून हा कोविड लस अमृत महोत्सव सर्व शासकीय आणि महानगरपालिका लसीकरण केंद्रांवर राबविला जाणार आहे. यामध्ये, वय वर्षे १८ वरील ज्या पात्र लाभार्थ्यांनी कोविड-१९ लसीची दुसरी मात्रा घेतल्यानंतर ६ महिने अथवा २६ आठवडे पूर्ण झालेले आहेत, अशा लाभार्थ्यांना प्रतिबंधात्मक मात्रा (प्रिकॉशन डोस) विनामूल्य दिली जाणार आहे.
केंद्र सरकारच्या निर्देशानुसार, बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात दिनांक १६ जानेवारी २०२१ पासून कोविड-१९ प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम सुरु आहे. प्रारंभी प्राधान्य गटांचे व त्यानंतर दिनांक १ मे २०२१ पासून १८ वर्ष वयावरील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. यासाठी मुंबईत महानगरपालिका व शासकीय रुग्णालयात १०४ तर खासगी रुग्णालयात १२५ अशी एकूण २२९ कोविड-१९ लसीकरण केंद्रं सध्या कार्यान्वित आहेत. वय वर्षे १८ वरील लाभार्थी लक्षात घेता, मुंबईत आतापर्यंत १ कोटी ०३ लाख १५ हजार ००४ लाभार्थ्यांना (११२ टक्के) पहिली मात्रा देण्यात आली आहे. तर ९३ लाख ५६ हजार ५४१ लाभार्थ्यांना (१०१ टक्के) दुसरी मात्रा देण्यात आली आहे.
कोविड-१९ लसीची प्रतिबंधात्मक मात्रा (प्रिकॉशन/बूस्टर डोस) दिनांक १० जानेवारी २०२२ पासून देण्यात येत आहे. यामध्ये फक्त आरोग्य कर्मचारी, आघाडीवर काम करणारे (फ्रंटलाईन) कर्मचारी त्याचप्रमाणे ६० वर्षे वा त्यावरील सहव्याधी असलेले नागरिक यांनाच महानगरपालिका व शासकीय लसीकरण केंद्रांवर मोफत प्रतिबंधात्मक मात्रा देण्यात येत होती. तर १८ वर्षे वयावरील इतर सर्व पात्र नागरिकांना दिनांक १० एप्रिल २०२२ पासून खासगी रुग्णालयांमध्ये सशुल्क प्रतिबंधात्मक मात्रा घेण्यास परवानगी देण्यात आली. असे असले तरी, आतापर्यंत फक्त ९ लाख ९२ हजार १७७ (१२ टक्के) एवढ्या लाभार्थ्यांनी प्रतिबंधात्मक मात्रा (प्रिकॉशन डोस) घेतली आहे. म्हणजेच प्रतिबंधात्मक मात्रा लसीकरणाचे प्रमाण कमी असल्यामुळे त्याची गती वाढविणे आवश्यक आहे.
या अनुषंगाने, केंद्र सरकारने देशाच्या स्वातंत्र्यास ७५ वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून, दिनांक १५ जुलै ते ३० सप्टेंबर २०२२ या कालावधीपर्यंत ‘कोविड लस अमृत महोत्सव’ उपक्रमाचे आयोजन केले आहे. या ७५ दिवसांच्या कालावधीत वय वर्षे १८ वरील सर्व पात्र लाभार्थ्यांना कोविड-१९ लसीची प्रतिबंधात्मक मात्रा (प्रिकॉशन डोस) मुंबईतील सर्व शासकीय व महानगरपालिका लसीकरण केंद्रांवर विनामूल्य देण्यात येणार आहे. अर्थात, ज्या लाभार्थ्याने कोविड-१९ लसीची दुसरी मात्रा घेतल्यानंतर ६ महिने/ २६ आठवडे पूर्ण झालेले असतील, तेच लाभार्थी या प्रतिबंधात्मक मात्रा (प्रिकॉशन डोस) करीता पात्र असतील. कोविड लस अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने पात्र नागरिकांना लसीकरणाचा लाभ देण्याच्या अनुषंगाने, केंद्र सरकारतर्फे यासंदर्भात कोविन प्रणालीमध्ये आवश्यक ते बदल उद्या दिनांक १५ जुलै २०२२ रोजी सकाळपर्यंत करण्यात येणार आहेत.
सबब, कोविड लस अमृत महोत्सवाचा लाभ घेवून संबंधित पात्र मुंबईकर नागरिकांनी कोविड लसीची प्रतिबंधात्मक मात्रा (प्रिकॉशन डोस) घ्यावी, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांनी केले आहे.
रिपोर्टर