Breaking News
महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी घेतला पर्जन्य जल उपसा उपाययोजनांचा आढावा
मुंबई : लोकवार्ता टाइम्स
मुंबई महानगरात मागील दोन तीन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. या पार्श्वभूमीवर पश्चिम उपनगरांमध्ये पर्जन्य जल उपसा करण्यासाठी ठिकठिकाणी केलेल्या उपाययोजनांची पाहणी करण्यासाठी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी आज (दिनांक ६ जुलै २०२२) दौरा केला. ठिकठिकाणी उपस्थित अधिका-यांना आवश्यक ते निर्देशही त्यांनी दिले.
प्रारंभी, पोईसर नदी आणि परिसरात उद्भवणाऱ्या संभाव्य पूरस्थितीवर उपाय म्हणून करण्यात आलेल्या उपाययोजनांची पी. वेलरासू यांनी विविध जागी भेट देवून पाहणी केली. याप्रसंगी स्थानिक आमदार योगेश सागर, उपआयुक्त (परिमंडळ ७) डॉ. भाग्यश्री कापसे, सहायक आयुक्त संध्या नांदेडकर, सहायक आयुक्त मृदुला अंडे, प्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या), अशोक मेस्त्री आणि महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. यानंतर, मालाड भूयारी मार्ग (मालाड सबवे) येथे सखल भागात साचणाऱ्या पाण्याचा उपसा करण्यासाठी केलेल्या व्यवस्थेची देखील श्री. वेलरासू यांनी पाहणी केली.
सांताक्रूझ परिसरातील मिलन भूयारी मार्ग (मिलन सबवे) येथे पावसाळी पाण्याचा उपसा करुन लायन्स क्लब मैदानात बांधण्यात येत असलेल्या साठवण जलाशयामध्ये साठवण्यात येणार आहे. या साठवण जलाशयांच्या बांधकामाच्या प्रगतीची अतिरिक्त आयुक्त श्री. वेलरासू यांनी पाहणी केली. जलाशयांचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या दृष्टीने त्यांनी उपस्थित अधिकाऱयांना आवश्यक ते निर्देश दिले.
त्याचप्रमाणे, वांद्रे (पश्चिम) परिसरातील एस. व्ही. मार्गावर रेल्वे कॉलनी, जयभारत सोसायटी, खार सबवे या ठिकाणी पावसाळी पाणी निचरा करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचीही वेलरासू यांनी पाहणी करुन आढावा घेतला. याप्रसंगी एच. पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त विनायक विसपुते, प्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या) अशोक मेस्त्री आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
रिपोर्टर