Breaking News
झोपड्यांच्या बायोमेट्रिक सर्वेक्षणामुळे
एसआरए प्रकल्पांच्या कामाला मिळणार गती
- दहा सक्षम प्राधिका-यांची नेमणूक
मुंबई : लोकवार्ता टाइम्स
मुंबईतील झोपड्यांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने (एसआरए) पुन्हा सुरू केले आहे. या सर्वेक्षणामुळे मुंबईतील एसआरए प्रकल्पांच्या कामाला मिळणार गती मिळणार आहे. यासाठी एसआरएने उपजिल्हाधिकारी संवर्गातील दहा अधिका-यांची 'सक्षम प्राधिकारी' म्हणून नेमणूकही केली असल्याचे प्राधिकरणाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले.
मुंबई महानगरपालिका क्षेत्रात वसलेल्या सर्व झोपडपट्टयांमधील झोपडीधारकांचे बायोमेट्रीक सर्वेक्षण करण्याचा कार्यक्रम एसआरएमार्फत जानेवारी २०१६ पासून हाती घेण्यात आला आहे. मात्र अद्यापही काही झोपडीधारकांचा राहून गेलेला बायोमेट्रिक सर्व्हे पूर्ण करण्यासाठी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये एसआरएमार्फत या सर्वेक्षणाच्या कामाला पुन्हा गती देण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामार्फत झोपडीधारकांना त्यांचे अधिकार प्रदान करण्यासाठी झोपडीधारकांचे सर्वेक्षण करण्यात येते. याकरीता सदर सक्षम प्राधिकारी हे त्यांना नेमून दिलेल्या क्षेत्रातील झोपडपट्ट्यांचे ड्रोन सर्वेक्षण (GIS सर्वेक्षण) व बायोमेट्रीक सर्वेक्षण (MIS सर्वेक्षण) करण्यासाठी किमान सात दिवस आधी जाहीर सूचना प्रसिद्ध करतात. त्यानुसार बायोमेट्रीक सर्वेक्षण करणारे पथक जाहीर नोटीसीमध्ये नमूद केलेल्या दिवशी सदर झोपडपट्टयांमध्ये जाऊन झोपडपट्टयांचे ड्रोन सर्वेक्षण (GIS सर्वेक्षण) आणि बायोमेट्रीक सर्वेक्षण (MIS सर्वेक्षण) करतात. १ जानेवारी २००० रोजी पूर्वीचे झोपडीधारक मोफत आणि १ जानेवारी २०११ नंतरचे झोपडीधारक सशुल्क घरे मिळणेस पात्र असणार आहेत.
बायोमेट्रीक सर्वेक्षणावेळी सर्व झोपडीधाकांनी शासन निर्णय १६ मे २०१५ आणि १६ मे २०१८ मध्ये नमुद केलेली आवश्यक कागदपत्रे स्वयंसाक्षांकीत करून दाखल करावी आणि आवश्यक ती माहिती देऊन सर्वेक्षण करणा-या पथकास सहकार्य करण्याची विनंती एसआरए प्राधिकरणाकडून करण्यात आली आहे. सर्वेक्षण हे केवळ झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामार्फत केले जात असून यात कोणत्याही विकासकाचा अथवा संस्थेचा संबंध नसल्याचे एसआरएच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
रिपोर्टर