Breaking News
क्षयरोग नियंत्रणासाठी महापालिका घरोघरी जाऊन तपासणी करणार
मुंबईतील २४ क्षयरोग जिल्हयातील ५४ टीबी युनिट परिसरांमधील १७ लाख लोकांची तपासणी होणार
मुंबई : लोकवार्ता टाइम्स
बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात क्षयरोग नियंत्रणासाठी व प्रतिबंधासाठी महापालिकेचा सार्वजनिक आरोग्य विभाग सातत्याने प्रयत्नशील आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून येत्या १५ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर २०२१ दरम्यान महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या चमू घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी करणार आहेत. या तपासणी अंतर्गत साधारणपणे १७ लाख लोकांची तपासणी होणार आहे. हे सर्वेक्षण सकाळी ९ ते सायंकाळी ४ या वेळेत केले जाणार आहे. तरी मुंबईकर नागरिकांनी महापालिकेच्या क्षयरोग तपासणी पथकास सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी केले आहे.
१५ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर २०२१ दरम्यान 'Special Active Case Finding' हे या वर्षाचे पहिले विशेष क्षयरोग तपासणी अभियान महापालिकेद्वारे राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत क्षयरोगाचा प्रभाव तुलनेने अधिक जाणवलेल्या ५४ टीबी युनिट परिसरांमधील साधारणपणे १७ लाख व्यक्तींची क्षयरोग तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणी अभियानासाठी महापालिकेचे ८७६ चमू कार्यरत राहणार आहेत. या चमूत त्यांच्या कार्यक्षेत्रातील घरांना प्राधान्याने सकाळी ९ ते सायंकाळी ४ या वेळेत भेटी देऊन क्षयरोग विषयक वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. तथापि, घरातील व्यक्ती कामानिमित्त किंवा इतर कारणांसाठी बाहेर असल्यास हे चमू दिवसातील इतर वेळी देखील भेट देऊन तपासणी करतील, अशी माहिती डॉ. मंगला गोमारे यांनी यांनी दिली आहे.
यानुसार प्राथमिक तपासणी दरम्यान आढळणा-या संशयित रुग्णांची बेडक्यांची तपासणी व क्ष-किरण चाचणी केली जाणार आहे. ही चाचणी त्या परिसराच्या जवळपास असणा-या सरकारी किंवा मुंबई महानगर पालिकेच्या प्रयोगशाळेत केली जाणार आहे. तर क्ष-किरण चाचणी निर्धारित खाजगी क्ष-किरण केंद्रामध्ये केली जाणार आहे. निर्धारित करण्यात आलेल्या खाजगी क्ष-किरण केंद्रामध्ये तपासणी करता यावी, यासाठी संशयित रुग्णाला विशेष 'व्हाऊचर' देण्यात येणार आहे. ज्यामुळे संशयित रुग्णाला निर्धारित करण्यात आलेल्या खाजगी क्ष-किरण केंद्रामध्ये जाऊन ही चाचणी मोफत करुन घेता येणार आहे.
या अभियानादरम्यान क्षयरोगाची बाधा आढळून आलेल्या रुग्णांना औषधोपचार मोफत दिले जाणार आहेत. क्षयरोग विषयक लक्षणांबाबत माहिती देताना महापालिकेच्या सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. प्रणिता टिपरे यांनी सांगितले की, १४ दिवसांपेक्षा अधिक काळ खोकला असणे, २ आठवड्यांपेक्षा अधिक काळ ताप किंवा सायंकाळच्या वेळेस ताप येणे, लक्षणीय स्वरुपात वजन कमी होणे, थूंकीमधून रक्त पडणे, छातीत दुखणे, मानेवर सुज असणे ही क्षयरोगाची लक्षणे आहेत. अशी लक्षणे आढळून आल्यास संबंधितांनी तातडीने महापालिकेच्या वा सरकारी रुग्णालयातून क्षयरोगाची चाचणी करवून घ्यावी. ही चाचणी पूर्णपणे मोफत आहे.
तसेच ज्यांच्या कुटुंबामध्ये एखाद्यास क्षयरोगाची बाधा असल्याचा इतिहास आहे किंवा ज्यांना यापूर्वी क्षयरोगाची बाधा झाली होती, अशा व्यक्तींनी क्षयरोगांच्या लक्षणांबाबत अधिक जागरूक असणे अत्यंत गरजेचे आहे, असेही डॉ.टिपरे यांनी सांगितले आहे. तर ज्यांना क्षयरोगाची बाधा झाली आहे, त्यांनी नियमितपणे औषाधोपचाराचा कोर्स पूर्ण केल्यास क्षयरोग बरा होऊ शकतो. मात्र यासाठी डॉक्टरांनी सांगितलेल्या पद्धतीनेच औषधोपचार घेणे अत्यंत आवश्यक आहे, अशीही माहिती यानिमित्ताने कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. गोमारे यांनी आवर्जून दिली आहे.
रिपोर्टर