भांडुपच्या अर्भक मृत्यू प्रकरणी फौजदारी चौकशी करा - भाजपा नेते आशिष शेलार
मुंबई : लोकवार्ता टाइम्स
भांडुप येथील सावित्रीबाई फुले प्रसुतीगृहात घडलेल्या चार बालक मृत्यू प्रकरणाची वैद्यकीय चौकशी ही निपक्ष झाली पाहिजे, तसेच हा एक घोटाळा असून या प्रकरणाची फौजदारी चौकशी करा, अशी मागणी भाजपा नेते आमदार अँड. आशिष शेलार यांनी आज केली.
मुंबई महापालिकेच्या भांडुप येथील सावित्रीबाई फुले प्रसुतीगृहात सलग चार नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची घटना विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उघड केली होती. आज भाजपा नेते आमदार अँड.आशिष शेलार आणि भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी रुग्णालयात जाऊन घटना स्थळाची पाहणी करुन डाँक्टरांकडून परिस्थितीची माहिती घेतली.
याबाबत माध्यमांशी बोलताना आमदार अँड आशिष शेलार म्हणाले की, ही घटना जेवढी दुर्दैवी आहे तेवढीच डोकं फिरवणारी संताप जनक आहे. चार निष्पाप बालकांचा दुर्दैवाने मृत्यू झाला ही घटना मुंबई महापालिकेच्या सत्ताधा-यांना माहिती नव्हती. जेव्हा विरोधी पक्षांनी ही बाब विधानसभेत मांडली तेव्हा ही घटना पालिकेला समजली. आता त्याची चौकशी करण्यात येत असली तरी सदर रूग्णालय पालिकेचे, त्याची चौकशी करणारे ही पालिकेच्या सायन रुग्णालयातील डाँक्टर त्यामुळे पालिकेच्या यंत्रणेची पालिकाच निपक्षपाती चौकशी कशी करणार ? म्हणून या प्रकरणाची त्रयस्थांमार्फत चौकशी झाली पाहिजे. तसेच या रुग्णालयातील एनआयसीयु (नवजात शिशु अतिदक्षता विभाग) हा महापालिका चालवत नसून त्याचे कंत्राट मे. इंडियन पेडियाट्रिक नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड खाजगी वैद्यकीय संस्थेस दिले आहे. यासाठी या संस्थेला मुंबई महापालिकेने ३ वर्षांसाठी ८ कोटी २१ लाख २५ हजार रुपयांचे कंत्राट देण्यात आले आहे. या संस्थेला जेव्हा स्थायी समितीने कंत्राट दिले त्यावेळी केवळ एकच कंपनी आली आणि तिला काम देण्यात आले. त्यामुळे हा एक घोटाळा असल्याचे आशिष शेलार म्हणाले.
प्रसूतीगृहातील वातानुकुलित यंत्रणेमध्ये झालेल्या शॉर्टसर्किटमुळे/ बिघाडामुळे आणि अथवा अन्य कारणामुळे नवजात अर्भकांसाठीच्या अतिदक्षता कक्षातील चार दुर्दैवी बालकांचा मुत्यू हा जंतूसंसर्गाने झाला आहे तसेच ही घटना घडत होती तेव्हा या विभागात पालकांना जाऊन दिले जात नव्हते, त्या विभागात पाणी साचले होते याबाबींची चौकशी वैद्यकीय चौकशीत कशी होणार? त्यामुळे या प्रकरणी फौजदारी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आमदार अँड आशिष शेलार यांनी केली आहे.
रिपोर्टर