Breaking News
तीक्ष्ण सळई शरीरात घुसून गंभीर जखमी झालेल्या कामगाराचे प्राण वाचवण्यात महापालिकेच्या डॉक्टरांना यश
- वांद्रे येथील के.बी.भाभा महानगरपालिका रुग्णालयातील वैद्यकीय तज्ञांची कामगिरी
मुंबई : लोकवार्ता टाइम्स
झाडावरून पडून कुंपणावर कोसळलेल्या एका कामगाराच्या छातीजवळ तीक्ष्ण सळई शिरून तो गंभीर जखमी झाला होता. वांद्रे येथील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या के. बी. भाभा महानगरपालिका रुग्णालयातील वैद्यकीय तज्ञांनी या गंभीर जखमी कामगारावर तातडीने उपचार करून त्याचे प्राण वाचवले. सुमारे आठवडाभराच्या वैद्यकीय देखरेखीनंतर या कामगाराला आता रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली असून दोन ते तीन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर हा रुग्ण पूर्णपणे बरा होणार आहे.
यासंदर्भात सविस्तर माहिती देताना महानगरपालिकेच्या प्रमुख वैद्यकीय अधीक्षक डॉ. (श्रीमती) विद्या ठाकूर यांनी सांगितले की, वांद्रे परिसरात मजुरी काम करताना एक २२ वर्षीय तरुण कामगार झाडावर चढला होता. तथापि तोल न राखता आल्याने हा मजूर झाडावरून कोसळून खाली असलेल्या कुंपणावर पडला. कुंपणाच्या भिंतीवर लावलेल्या संरक्षक जाळीतील टोकदार बाणाचा अग्रभाग असलेली सळई या तरुणाच्या छातीत घुसली. उंचावरून हा तरुण पडल्याने सळई देखील मोडली आणि त्याच अवस्थेत रक्तबंबाळ होऊन तो जमिनीवर कोसळला. दिनांक २६ जुलै २०२२ रोजी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
सदर कामगाराच्या सहकाऱ्यांनी त्याला तातडीने नजीकचे रुग्णालय म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वांद्रे स्थित के. बी. भाभा रुग्णालयात दाखल केले. या तरुणाची रक्तबंबाळ अवस्था आणि गंभीर स्थिती पाहता उपस्थित वैद्यकीय तज्ञांनी तातडीने सदर कामगारावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.
शस्त्रक्रियेपूर्वी क्ष-किरण तपासणी करण्यात आली. त्यात आढळले की, जखमी व्यक्तीच्या छातीजवळ घुसलेली तीक्ष्ण सळई सुदैवाने फुप्फुसांपर्यंत पोहोचली नव्हती, त्यामुळे फुप्फुसांना इजा झाली नाही. मात्र एक बरगडी (पासळी) तुटली होती आणि रक्तस्राव होत असल्याने या कामगाराची प्रकृती गंभीर होती. भूलतज्ञ डॉ. वरुण नाईक आणि डॉ. सोनाली कागडे यांनी कौशल्यपूर्वक रुग्णाला भूल दिली आणि त्यानंतर तातडीने शस्त्रक्रिया सुरू करण्यात आली. शल्यचिकित्सा विभागाचे वरिष्ठ सल्लागार डॉ. विनोद खाडे, डॉ. अमीत देसाई, डॉ. श्रद्धा भोने तसेच परिचारिका श्रीमती मानसी सरवणकर, श्रीमती रेश्मा पाटील यांच्या पथकाने सुमारे तासभर शस्त्रक्रिया करून सळई यशस्वीपणे बाहेर तर काढलीच सोबत या कामगाराला धोक्याच्या अवस्थेतून देखील बाहेर काढले. अपघात घडल्यानंतर या रुग्णाला तातडीने रुग्णालयात दाखल केल्याने सुदैवाने रक्तपुरवठा करण्याची गरज भासली नाही.
तथापि, कामगाराच्या शरीरातील सळई बाहेर काढल्यानंतर खोलवर असलेल्या जखमेमुळे फुप्फुसांजवळ आणि हृदयाजवळ अंतर्गत रक्तस्राव जमा होऊ नये तसेच हवा भरली तर ती बाहेर काढता यावी यासाठी नळी (inter coastal tube) टाकण्यात आली. अतिशय कठीण अशी ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर या रुग्णास संपूर्ण एक दिवस अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. उपचारास चांगला प्रतिसाद मिळू लागल्यानंतर या रुग्णास सर्वसाधारण कक्षात स्थलांतरित करण्यात आले. तसेच सुमारे आठवडाभराच्या वैद्यकीय उपचारानंतर आणि योग्य आहार दिल्यानंतर प्रकृती सुधारल्याने हा रुग्ण आता घरी परतला असून त्यास दोन ते तीन आठवडे पूर्णतः विश्रांतीचा वैद्यकीय सल्ला देण्यात आला आहे, अशी माहिती या रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय पाटील यांनी दिली आहे. सदर तरुण कामगारावर अतिशय कौशल्यरित्या शस्त्रक्रिया करून त्याचे प्राण वाचवल्याने महानगरपालिकेच्या वैद्यकीय पथकाचे कौतुक केले जात आहे.
रिपोर्टर