Breaking News
खड्डे बुजविसाठी महापालिकेच्या २४ संयुक्त पथकांची नेमणूक
मुंबई : लोकवार्ता टाइम्स
मुंबईमधील रस्त्यांवरील खड्ड्यांची समस्या निकाली काढण्यासाठी प्रशासनाच्यावतीने विविध उपाययोजना करण्यात येत असतात. रस्त्यांवर निदर्शनास आलेले खड्डे त्वरीत बुजविण्याचे कार्य महानगरपालिकेतर्फे हाती घेण्यात येते. असे असले तरी, सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त होणारी खड्ड्यांबाबतची नाराजी लक्षात घेता, महानगरपालिकेतर्फे सर्व २४ प्रशासकीय विभागनिहाय संयुक्त पथकांची नेमणूक करण्यात आली आहे.
विभाग कार्यालये आणि रस्ते विभाग यांचा या पथकांमध्ये समावेश आहे. ही पथके खड्डे बुजविण्याच्या कामकाजामध्ये योग्य समन्वय साधणार आहेत. मुंबई महानगरपालिका प्रशासनाने दिनांक ९ एप्रिल ते दिनांक ११ सप्टेंबर २०२१ या कालावधीमध्ये महानगरपालिका हद्दीतील रस्त्यांवरील एकूण ३३ हजार १५६ खड्डे बुजवले आहेत. त्यासाठी महानगरपालिकेच्या वरळीमधील धूम्रजतू संयंत्र (अस्फाल्ट प्लांट) येथे निर्मित केलेले सुमारे २७५० मेट्रिक टन कोल्डमिक्स २४ विभाग कार्यालयात वितरित करण्यात आलेले आहे. त्यातून आतापर्यंत विभाग कार्यालयातील उपलब्ध कामगारांमार्फत २४ हजार ०३० खड्डे बुजविण्यात आलेले आहेत. तर, खड्डे बुजविण्यासाठी नियुक्त केलेल्या कंत्राटदारांकडून २४ विभाग कार्यालयांच्या हद्दीत ९ हजार १२६ खड्डे बुजविण्यात आले असल्याची माहिती महापालिकेच्यावतीने देण्यात आली. तसेच प्रकल्प रस्ते आणि दोष दायित्व कालावधीत असलेले रस्ते हे संबंधित नियुक्त कंत्राटदाराकडून निविदेतील अटी व शर्तींनुसार मर्यादीत वेळेत तसेच विनामूल्य भरण्यात येतात. हे खड्डे भरण्यासाठी महानगरपालिकेतर्फे कोणताही आर्थिक मोबदला दिला जात नाही, असेही स्पष्ट करण्यात आले.
डांबराचे रस्ते (अस्फाल्ट रोड) मध्ये असलेल्या बिटुमनच्या गुणधर्मानुसार पावसाळ्यात पाण्याच्या संपर्कामुळे खड्डे पडणे ही नित्य प्रक्रिया आहे. ही बाब लक्षात घेता, खड्डयांची समस्या निकाली काढण्यासाठी टप्प्याटप्प्याने रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे भविष्यात अधिकाधिक रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण होऊन खड्ड्यांचा प्रादुर्भाव कमी होणार आहे. रस्त्यांवर सद्यस्थितीत निदर्शनास येत असलेले खड्डे त्वरित बुजविण्याची कार्यवाही महानगरपालिकेकडून करण्यात येत असते. असे असले तरी सामान्य नागरिकाकडून काही प्रसंगी खड्ड्यांबाबत नाराजी व्यक्त केली जाते. ही बाब लक्षात घेता, रस्त्यांवरील खड्डे भरण्याच्या कार्यवाहीमध्ये योग्य समन्वय साधण्यासाठी महानगरपालिकेतर्फे सर्व २४ प्रशासकीय विभागानुसार संयुक्त पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. ही पथके विभाग कार्यालयासोबत खड्डे बुजविण्याच्या कामासाठी योग्य समन्वय साधतील. त्यामुळे खड्डे भरण्याच्या कार्यवाहीला आणखी वेग येवून ती सुलभतेने पार पडण्यास मदत होणार आहे, असेही महापालिकेच्यावतीने स्पष्ट करण्यात आले.
रिपोर्टर