Breaking News
मुंबई महानगरपालिकेच्या ४,९५० परिचारिकांना संसर्ग प्रतिबंध प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न !
मुंबई : लोकवार्ता टाइम्स
ईको इंडिया या संस्थेच्या पुढाकाराने देण्यात आले मोफत शास्त्रशुद्ध प्रशिक्षण “कोविड – १९ साथरोगाच्या प्रादुर्भावादरम्यान बृहन्मुंबई महानगरपालिकेची विविध रुग्णालये, दवाखाने इत्यादींमध्ये परिचारिकांनी केलेली रुग्णसेवा निश्चितच कौतुकास्पद व अभिनंदनीय आहे. त्यांचे रुग्णसेवेचे कार्य अधिकाधिक प्रभावी व कालसुसंगत व्हावे, यासाठी ‘ईको इंडिया’ या संस्थेच्या सहकार्याने एका विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ४ ऑक्टोबर २०२१ पासून सुरु झालेल्या प्रशिक्षण कार्यक्रमात ४ हजार ९५० परिचारिकांना संसर्ग प्रतिबंध विषयक (Infection Prevention & Control) प्रशिक्षण देण्यात आले. सदर संस्थेचे हे कार्य अभिनंदनीय व अनुकरणीय आहे”, असे गौरवोद्गार अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांनी काढले. ते आज प्रशिक्षण कार्यक्रमाच्या समारोपीय परिषदेत उपस्थितांशी संवाद साधताना बोलत होते.
परळ परिसरात आयोजित या कार्यक्रमाला भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचे महासंचालक (परिचर्या) रथी बालचंद्रन, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये) डॉक्टर नीलम आंद्रादे, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे, उप कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह व डॉ. संतोष गायकवाड, ‘ईको इंडिया’ या संस्थेचे अध्यक्ष डॉ. (कर्नल) कुमुद राय, ‘ईको इंडिया’ संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. सुनील आनंद यांच्यासह वैद्यकीय व आरोग्य क्षेत्रातील विविध मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.
आज (दि. १५ मार्च २०२२) आयोजित करण्यात आलेला एक दिवसीय विशेष प्रशिक्षण कार्यक्रम हा ‘इन्फेक्शन प्रिव्हेंशन अँड कंट्रोल प्रॅक्टिसेस' या विषयावर आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात प्रामुख्याने 'महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल येथील संबंधितांनी सहभाग नोंदविला. यात महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल, राष्ट्रीय आरोग्य अभियान (महाराष्ट्र), कोलकता महानगरपालिका इत्यादींच्या प्रतिनिधींचा समावेश होता.
दिनांक ४ ऑक्टोबर २०२१ पासून सुरु असलेल्या या प्रशिक्षण कार्यक्रमामागची भूमिका स्पष्ट करताना सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे नमूद करण्यात आले की, आरोग्य व वैद्यकीय विषयक सेवांबाबत सातत्याने संशोधन होत असते. तसेच या संबंधिच्या तंत्रज्ञानात देखील नियमितपणे प्रगती होत असते. यामुळेच आरोग्य व वैद्यकीय विषयक सेवा देणा-या व्यक्तिंना अधिकाधिक परिणामकारक प्रशिक्षण देणे गरजेचे असते. यानुसार ‘संसर्ग प्रतिबंध आणि नियंत्रण’ याबाबत अधिक शास्त्रशुद्ध व अद्ययावत प्रशिक्षणाचा लाभ अधिकाधिक परिचारिकांना मिळावा, या उद्देशाने या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण कार्यक्रमातून मिळणा-या ज्ञानाचा आणि माहितीचा उपयोग हा परिचारीकांना त्यांच्या दैनंदिन रुग्णसेवेत करता येणार आहे.
दर आठवड्याला एक दिवस या प्रमाणे सलग १३ आठवडे हा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. परिचारीकांना या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होणे सुलभ व्हावे, याकरीता त्यांना ‘ईको इंडिया’ या संस्थेद्वारे टॅबलेट्स देण्यात आले होते. त्याचबरोबर सार्वजनिक आरोग्य खात्याच्या ८ कार्यालयांमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सींगसाठी आवश्यक ती यंत्रसामुगी देखील सदर संस्थेद्वारे मोफत उपलब्ध करुन देण्यात आली होती. या सर्व बाबींमुळे हा प्रशिक्षण कार्यक्रम अधिक प्रभावी व परिणामकारक होण्यास मदत झाली.
बृहन्मुंबई मनपाची प्रमुख रुग्णालये, उपनगरीय रुग्णालये, प्रसूतीगृहे, आरोग्य केंद्रे इत्यादी ठिकाणी कार्यरत असणा-या परिचारीकांना 'संसर्ग प्रतिबंध आणि नियंत्रण' या विषयावर हे प्रशिक्षण देण्यात आले. 'संसर्ग प्रतिबंध आणि नियंत्रण' हा विषय अत्यंत महत्त्वाचा असून प्रत्येक आरोग्य कर्मचा-याचे या बाबतचे ज्ञान सतत अद्यावत करणे आवश्यक आहे. हे लक्षात घेऊन १३ मॉड्युल्सचे सदर प्रशिक्षण हे ऑनलाईन व प्रत्यक्ष पद्धतीने आयोजित करण्यात आले होते. यातील १० मॉड्युल्स हे संसर्ग प्रतिबंध आणि नियंत्रण याबद्दल होते. तर ३ मॉड्युल्स हे कार्यक्षमता व कौश्यल्य याबाबत होते, अशीही माहिती या निमित्ताने सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे देण्यात आली आहे.
रिपोर्टर