Breaking News
मुंबई महानगरपालिका मुख्यालयाच्या इमारतीला गुलाबी रंगाचीची आकर्षक रोषणाई
- आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्ताचे औचित्य
मुंबई : लोकवार्ता टाइम्स
आंतरराष्ट्रीय बालिका दिवस निमित्ताने बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयाची इमारत सोमवारी गुलाबी रंगाच्या विद्युत झोतात उजळून निघाली.
सन २०११ पासून दरवर्षी ११ ऑक्टोबर रोजी संयुक्त राष्ट्रसंघाने आंतरराष्ट्रीय बालिका दिवस साजरा करण्यास सुरुवात केली आहे. जगभरातील बालिकांना भेडसावणा-या समस्यांबाबत जनजागृती व्हावी, तसेच बालिकांना त्यांचे अधिकार मिळावेत, या हेतूने दरवर्षी ११ ऑक्टोबर रोजी हा दिवस साजरा करण्यात येतो. आंतरराष्ट्रीय स्तरावर बालिका दिवस साजरा व्हावा, यासाठी संयुक्त राष्ट्रसंघामध्ये कॅनडा या देशाने नेतृत्व केले होते.
या पार्श्वभूमीवर, कॅनडाचे मुंबईतील राजदूत श्री. केथ कॅन यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला पत्र लिहून, ११ ऑक्टोबर २०२१ रोजी महानगरपालिका मुख्यालयाची इमारत गुलाबी रंगाने विद्युत रोषणाईने उजळावी, अशी विनंती केली होती. या विनंतीचा मान राखत तसेच बालिकांच्या हक्क, अधिकारांविषयी जनजागृती व्हावी, या उद्देशाने सोमवारी बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय इमारत ही गुलाबी रंगातील विद्युत दिव्यांच्या आकर्षक रोषणाई करण्यात आली.
यंदाच्या (२०२१) आंतरराष्ट्रीय बालिका दिवसाचे घोषवाक्य ‘डिजीटल जनरेशन, अवर जनरेशन’ असे आहे. आधुनिक युगात, मुलांइतकाच मुलींनाही अद्ययावत तंत्रज्ञानाचा तसेच साधनांच्या वापराचा अधिकार मिळावा, हा या घोषवाक्यामागील जनजागृतीपर उद्देश आहे.
रिपोर्टर