Breaking News
आरटीई अंतर्गत प्रवेश न देणाऱ्या शाळेची मान्यता रद्द करा !
- मनसेची शिक्षणाधिकाऱ्याकडे मागणी ; अन्यथा आंदोलन छेडणार
मुंबई : लोकवार्ता टाइम्स
शालेय शैक्षणिक वर्ष सुरू झाले तरी काही शाळांच्या अडेलतट्टू भूमिकेमुळे आरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया रखडली आहे. ठाण्यातील युरोस्कूल या नामांकित शाळेने जवळपास २५ विद्यार्थ्याना आरटीई अंतर्गत प्रवेश नाकारला आहे. याची गंभीर दखल मनसेने घेतली असुन अशा मुजोर शाळेची मान्यता रद्द करा. अशी मागणी मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी शिक्षणाधिकाऱ्यांकडे केली आहे. मनसेने या संदर्भात ठाणे महापालिका शिक्षणाधिकारी यांना निवेदन दिले असून तात्काळ कार्यवाही न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे.
केंद्र सरकारने २००९ साली राईट टू एज्यूकेशन म्हणजेच आरटीई कायद्याअंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण देण्याची तरतूद करण्यात आली. यात शिक्षणाचा अधिकार, पालकांचे कर्तव्य आणि इतर अनेक गोष्टींचाही उल्लेख करण्यात आलेला आहे. या कायद्यानुसार खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश स्तरावर २५ टक्के जागा वंचित आणि दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. मात्र, ठाण्यातील युरो शाळेने विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास नकार दर्शविल्याची बाब समोर आली आहे. जवळपास २५ विद्यार्थ्यांच्या पालकांची नाहक ससेहोलपट होत आहे. ज्या बालकांना युरो स्कूलमध्ये प्रवेश मिळाला आहे अशा बालकांना, युरोस्कूल शाळा प्रवेश देण्यास टाळाटाळ करत असल्याची तक्रार पालकांनी मनसेकडे केली.
दरम्यान, घोडबंदर रोडपासून ११ किलोमीटर अंतरावर असलेल्या ठाणे महापालिकेच्या शाळेत प्रवेश घेण्यास सांगितले असल्याच्या असल्याच्या तक्रारी पालक वर्गाकडून केल्या जात आहेत. आम्ही आमच्या मुलाला ११ किलोमीटर दूर असलेल्या पालिका शाळेत कसे पाठवायचे ? असा प्रश्न पालकांना पडला आहे. ठाणे जिल्हा परिषद प्रशासनाकडुनही मदत मिळत नसल्याच्या तक्रारी पालकांनी मनसेकडे केल्या आहेत. आमच्या मुलांना घोडबंदर रोड परिसरातील कोणत्याही चांगल्या शाळेत प्रवेश देण्यासाठी जिल्हा परिषदेने मदत केली नसल्याचा सूर पालकांनी आळवला आहे. या तक्रारींची दखल घेत मनसेचे अविनाश जाधव यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन दिले. तसेच गरजु आणि गरीब विद्यार्थी प्रवेशाविना अभ्यासापासून दूर राहिल्यास मनसे स्टाईलने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा अविनाश जाधव यांनी दिला आहे.
रिपोर्टर