Breaking News
मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये लवकरच सुरु होणार आय.बी.बोर्डाचे आंतरराष्ट्रीय शिक्षण
- महानगरपालिका आणि आय.बी.बोर्ड पदाधिका-यांची संयुक्त बैठक संपन्न
मुंबई : लोकवार्ता टाइम्स
मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधून विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळावे, पर्यायाने त्यांच्या उच्च शिक्षणामध्ये व कारकीर्दीत गुणवत्तापूर्ण सुधारणा व्हावी, यासाठी राज्याचे पर्यटन, पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रयत्नातून सीबीएसई आणि आयसीएसई अभ्यासक्रम सुरु झाल्यानंतर आता इंटरनॅशनल बॅकॉलॉरेट अर्थात आय.बी.या आंतरराष्ट्रीय बोर्डाचा अभ्यासक्रम देखील लवकरच सुरु होणार आहे. या अनुषंगाने आदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिका प्रशासनाचे उच्च पदस्थ अधिकारी आणि आय. बी. बोर्डाचे पदाधिकारी यांची संयुक्त बैठक आज सोमवारी एक बैठक पार पडली.
‘आय.बी. बोर्ड’ च्या शाळांमध्ये नर्सरी ते १० वी पर्यंतचे शिक्षण उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामध्ये ३ ते १२ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी नर्सरी ते ५ वी च्या वर्गांसाठी PYP ( Primary Year Programme ) व ११ ते १६ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी ६ वी ते १० वी च्या वर्गांसाठी MYP (Middle Year Programme) अंतर्गत मोफत शिक्षण देण्यात येणार आहे. आय. बी. बोर्डची शाळा सुरू करण्याची आवश्यक ती सर्व कार्यवाही प्रशासनाकडून त्वरित करण्यात येत आहे. यामुळे येत्या जून महिन्यापासून नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला मुंबई महानगरपालिकेची आय. बी. बोर्डची एक व आय. जी. सी. एस. ई. बोर्डची एक शाळा सुरू होणार आहे.
सर्वसामान्य विद्यार्थ्यांना महानगरपालिकेच्या शाळांमधून दर्जेदार शिक्षण विनामूल्य मिळावे, यासाठी पालकमंत्री श्री. आदित्य ठाकरे यांच्या दूरदृष्टी संकल्पनेतून ११ सीबीएसई व १ आयसीएसई शाळा यशस्वीरित्या सुरू झाल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून प्रत्येक विभागामध्ये किमान एक सीबीएसई शाळा सुरू करण्याचा महानगरपालिका प्रशासनाचा मानस आहे. आता त्याही पुढे जाऊन महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण व ते देखील विनामूल्य मिळावे, यासाठी पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आय.बी.बोर्डचे अधिकारी तसेच महानगरपालिका प्रशासनातील उच्चस्तरिय अधिकारी यांची ही संयुक्त बैठक पार पडली. येत्या शैक्षणिक वर्षात आय. बी. (I. B. - International Baccalaureate) बोर्डची शाळा सुरू करण्याबाबत यामध्ये निर्णय घेण्यात आला आहे . एकूणच सर्वसामान्यांसाठी याद्वारे मोफत व सर्वोच्च दर्जाच्या आंतरराष्ट्रीय शिक्षणाची दारे बृहन्मुंबई महानगरपालिका खुली करत आहे.
आय.बी.बोर्डच्या आशिया विभाग प्रमुख स्टिफेन लिआँग, महेश बालकृष्णन, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोशी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, सहआयुक्त (शिक्षण) अजीत कुंभार, शिक्षण समिती सदस्य साईनाथ दुर्गे, शिक्षणाधिकारी श्री. राजेश कंकाळ, राजू तडवी आदी मान्यवर या बैठकीस उपस्थित होते
रिपोर्टर