Breaking News
बेस्ट उपक्रमातील सर्व बसताफा २०२८ पर्यंत होणार इलेक्ट्रीक
पर्यावरण स्नेही मुंबई घडविण्याच्या दिशेने तीन नवीन सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
मुंबई : लोकवार्ता टाइम्स
सन २०२८ पर्यंत मुंबईतील बेस्ट उपक्रमाच्या सर्व बसेस या विद्युत ऊर्जेवर धावणा-या अर्थात इलेक्ट्रीक असतील, असे उद्गार राज्याचे पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी काढले. प्रगतीशिल आणि त्यासोबत पर्यावरण स्नेही मुंबई महानगर घडवण्याच्या दिशेने वेगाने पावले टाकली जात असून त्यामध्ये नुकतेच स्वाक्षरी करण्यात आलेले तीनही सामंजस्य करार हे महत्त्वाचे आहेत.
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, उपमहापौर सुहास वाडकर, स्थानिक खासदार अरविंद सावंत, महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, सभागृह नेता विशाखा राऊत, विरोधी पक्षनेता रवी राजा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गटनेता राखी जाधव, स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव, सुधार समितीचे अध्यक्ष सदानंद परब, स्थापत्य समिती (उपनगरे) अध्यक्ष स्वप्नील टेंबवलकर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. संजीव कुमार, बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्रा, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी, सहआयुक्त अजित कुंभार, रमेश पवार, चंद्रशेखर चोरे, उपआयुक्त रमाकांत बिरादार, सुनील गोडसे आणि इतर मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
स्थापत्य समिती (शहर) अध्यक्ष दत्ता पोंगडे, महिला व बालकल्याण समिती अध्यक्षा राजराजेश्वरी रेडकर, स्थानिक नगरसेविका सुजाता सानप तसेच सी ४० सिटीजच्या जागतिक नेतृत्व प्रमुख श्रीमती जेन लुमुम्बा, वुमन फॉर क्लायमेटच्या प्रतिनिधी श्रीमती मार्था स्टेन्सल, डब्ल्यूआरआय इंडियाचे पवन मुलूकुटिया आणि इतर मान्यवरांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमास उपस्थिती लावली.
यावेळी संबोधित करताना आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, बृहन्मुंबई महानगरपालिकेने पर्यावरणाचे भान राखून त्याचे संवर्धन व संरक्षण करण्यासाठी याआधीच निरनिराळ्या उपायांची अंमलबजावणी केली आहे. कचऱयाचे ओला- सुका वर्गीकरण, माझी वसुंधरा अभियान अंतर्गत नागरी वनीकरणाचा भाग म्हणून गत दीड वर्षभरात लावलेली सुमारे अडीच लाख झाडे असे उपक्रम त्यात समाविष्ट आहेत. त्यापुढे जाऊन आता पर्जन्य जल संवर्धन करण्यासाठी गृहनिर्माण संस्था, शासकीय कार्यालये परिसर व शक्य तिथे शोष खड्डे करुन त्यात पाणी मुरवले पाहिजे. वाहतूक बेटं, उड्डाण पुलांखालील जागा, मैदानांभोवती कुंपण स्वरुपात याप्रमाणे झाडांची लागवड केली पाहिजे. वातावरण बदल तीव्र होत असून त्याचा सामना सर्वच देशांना करावा लागतो आहे. अशा स्थितीत सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येवून शाश्वत विकासासाठी एकदिलाने काम केले पाहिजे, असे आवाहनही ठाकरे यांनी केले. वातावरण बदल सक्षमतेसाठी चळवळ उभी करताना त्यात महिलांचे नेतृत्व उभे करण्यासाठी देखील आपण आज करार केला, ही समाधानाची बाब आहे, असे ते म्हणाले.
मुंबईतील बेस्ट उपक्रमामध्ये यापुढे दाखल होणारी प्रत्येक बस ही इलेक्ट्रीक असेल. सन २०२८ पर्यंत संपूर्ण बेस्ट बस ताफा हा इलेक्ट्रीक असेल, असा मानस व्यक्त करुन बेस्टच्या डबल डेकर बसेस या इलेक्ट्रीक किंवा हायड्रोजन फ्युएल सेल यापैकी जास्त सक्षम असेल, त्या ऊर्जेआधारे धावताना दिसतील, असेही ठाकरे यांनी नमूद केले.
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईच्या पर्यावरण संरक्षणासाठी उत्कृष्ट कामगिरी होत आहे. आजच्या सामंजस्य करारांमुळे सार्वजनिक व खासगी क्षेत्राला एकत्र आणण्याचे काम झाले आहे. पर्यावरण खात्याला लोकाभिमुख चेहरा देण्याची मोलाची कामगिरी आदित्य ठाकरे यांच्या प्रयत्नातून झाली आहे. पर्यावरण रक्षणामध्ये महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी केलेला करार हा महिला नेतृत्वाला अधिक वाव देणारा ठरेल, असा विश्वास महापौरांनी व्यक्त केला. मुंबईसह महाराष्ट्र प्रदूषणविरहीत झाले तर त्यातून देशाला उत्कृष्ट प्रोत्साहन मिळेल, असेही त्यांनी नमूद केले.
महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी मनोगतात नमूद केले की, खासगी क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय पातळीवर नामांकीत संस्थांसमवेत सामंजस्य करार केल्याने, जगभरात जे सर्वोत्कृष्ट कार्य अशा संस्थांद्वारे होते, ते तंत्रज्ञान, अनुभव महानगरपालिका प्रशासनाला मिळू शकणार आहे. शासनाने सन २०२५ पर्यंत १५ टक्के सार्वजनिक वाहतूक इलेक्ट्रीक वाहन आधारित करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. त्याहीपुढे जाऊन महानगरपालिकेने सन २०२३ पर्यंत ५० टक्के सार्वजनिक वाहतूक ही इलेक्ट्रीक वाहन आधारित करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. वातावरण बदल व पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती करण्यासाठी करण्यासाठी घेतलेला पुढाकार हा जनतेचा प्रत्यक्ष प्रेरक सहभाग वाढविण्यासाठी मोलाचा आहे, असे आयुक्तांनी नमूद केले. पर्यावरण संवर्धन व संरक्षणासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन योग्य दिशेने पुढे जात असल्याचा आत्मविश्वासही चहल यांनी व्यक्त केला.
बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्रा म्हणाले की, राज्य शासनाने अलीकडे जाहीर केलेल्या इलेक्ट्रीक वाहन धोरणाला अनुसरुन बेस्ट उपक्रमाची वाटचाल सुरु आहे. बेस्टचा ताफ्यामध्ये यापुढे इलेक्ट्रीक वाहनेच समाविष्ट केले जातील. महानगरामध्ये इलेक्ट्रीक वाहने विद्युत भारित (चार्ज) करण्यासाठी सुमारे ५५ ठिकाणे निवडली आहेत. तेथे खासगी-सार्वजनिक भागीदारीतून येत्या ३ ते ४ महिन्यात चार्जिंग स्टेशन उभे राहतील. यामुळे सर्वसामान्य जनतेलाही वाहने चार्ज करण्याची सुविधा मिळेल. जनतेला शाश्वत, किफायतशीर, उत्कृष्ट आणि सर्व परिसरांना जोडणारी अशी सार्वजनिक वाहतूक सुविधा बेस्टच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यासाठी आमूलाग्र बदल होत आहेत, असे त्यांनी नमूद केले.
रिपोर्टर