Breaking News
पनवेल ते गोरेगाव थेट लोकल सुरु
हार्बर आणि पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांचा प्रवास होणार सुलभ
मुंबई : लोकवार्ता टाइम्स
हार्बर ते पश्चिम रेल्वे मार्गावर लोकलच्या फेऱ्या फारच कमी असल्याने हार्बर मार्गावरून पश्चिम मार्गावर जाण्यासाठी प्रवाशांना खूप वेळ खर्च करावा लागतो. हार्बर मार्गावरुन पनवेल ते अंधेरीपर्यंतच फक्त लोकल सेवा सुरु होती, मात्र, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांना दिलासा देण्यासाठी मध्य रेल्वेने बुधवारी १ डिसेंबरपासून प्रथमच गोरेगाव ते पनवेल अशी लोकल सेवा सुरु केली. यामुळे हार्बर आणि पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांचा प्रवास होणार सुलभ होणार आहे.
हार्बरवर सध्या पनवेल ते अंधेरीपर्यंत असलेल्या लोकलचा आता विस्तार करुन ती गोरेगावपर्यंत नेण्यात येणार आली आहे. या लोकलच्या दिवसभरात अठरा फेऱ्या होणार आहेत. मध्य रेल्वेच्या हार्बर, ट्रान्सहार्बर, बेलापूर- नेरुळ- खारकोपर मार्गाचे सुधारित वेळापत्रक येत्या १ डिसेंबरपासून लागू होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
कांदिवली, मालाड, जोगेश्वरी, राम मंदिर आणि गोरेगाव स्थानकांतून हार्बरसाठी मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करत असतात. परंतु, या मार्गावर फक्त अंधेरीपर्यंतच लोकल धावत होती यासह, गोरेगाव ते पनवेल लोकल नसल्याने वसई, विरार, बोरिवली ते मालाड, गोरेगावपर्यंतच्या प्रवाशांना अंधेरी स्थानक गाठावे लागत होते. त्यामुळे प्रवाशांना खूप वेळा लागत होता. प्रवाशांच्या मागणीचा विचार करता अंधेरीपर्यंत असलेल्या हार्बरचा गोरेगावपर्यंत विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी २००९ मध्ये मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून एमयूटीपी २ अंतर्गत विस्ताराचे काम हाती घेण्यात आले होते.
हार्बर वासीयांचा प्रवास होणार गारेगार
वातानुकूलित लोकलचा अनुभव आता हार्बरवासीयांनाही मिळणार आहे. नेहमी दुर्लक्षित असलेल्या हार्बल रेल्वेवर आता वातानुकूलित लोकल चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. येत्या १ डिसेंबरपासून हार्बल रेल्वेवर सीएसएमटी ते पनवेल मार्गावर या एसी लोकल धावणार आहेत. त्यामुळे या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांनाही आता एसी लोकलचा अनुभव घेता येणार आहे.
सीएसएमटी ते पनवेल मार्गावर १२ एसी लोकल धावणार
सीएसएमटी ते पनवेल मार्गावर १ डिसेंबरपासून वातानुकूलित लोकल चालविण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. या लोकलच्या दिवसाला १२ फेऱ्या होणार आहेत. सामान्य लोकलच्या १२ फेऱ्यांऐवजी वातानुकूलित लोकलच्या फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. याशिवाय, मध्य रेल्वेने हार्बरवरील काही लोकल फेऱ्यांच्या वेळापत्रकातही बदल केले आहेत. त्यानुसार गोरेगाव आणि पनवेलच्या प्रवाशांनाही दिलासा मिळाला आहे. येत्या १ डिसेंबरपासून हे नवे वेळापत्रक लागू होणार आहे. या एसी लोकल फक्त सोमवार ते शनिवार चालवण्यात येणार आहेत. रविवारी आणि सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी मात्र एसी लोकलऐवजी साध्या लोकल चालविण्यात येईल. तर, मागणी वाढल्यास साध्या लोकल एसी लोकलने बदलण्यात येतील आणि रविवारी, तसेच सुट्ट्यांच्या दिवशीही एसी लोकल सोडल्या जातील. या एसी लोकलच्या तिकीटांचे तसेच पासचे दर सोमवारी जारी केले जातील. सध्या मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर (सीएसएमटी ते कल्याण) एसी लोकलच्या १० आणि ट्रान्सहार्बरवर (ठाणे ते वाशी पनवेल) एसी लोकलच्या १६ फेऱ्या चालविण्यात येत आहेत. हार्बर मार्गावरील एकूण फेऱ्यांची संख्या ६१४ आणि ट्रान्सहार्बर लाइनवर २६२ आहेत. मध्य रेल्वेच्या रोजच्या फेऱ्यांची एकूण संख्या १७७४ आहे.
हार्बरमार्गावरील एसी लोकलचे वेळापत्रक –
अप –
वाशी-सीएसएमटी – सकाळी ४. २५
पनवेल -सीएसएमटी – सकाळी ६.४५
पनवेल सीएसएमटी- सकाळी ९.४०
पनवेल सीएसएमटी- दुपारी १२.४१
पनवेल -सीएसएमटी- दुपारी ३.४५
पनवेल -सीएसएमटी- सायंकाळी ६.३७
डाऊन –
सीएसएमटी-पनवेल- सकाळी ५.१८
सीएसएमटी-पनवेल- सकाळी८.०८
सीएसएमटी-पनवेल- सकाळी ११.०४
सीएसएमटी- पनवेल- दुपारी २.१२
सीएसएमटी – पनवेल- सायंकाळी ५.०८
रिपोर्टर