Breaking News
माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गिका-३ कामांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आढावा
- मेट्रो मार्गिका-३ प्रकल्प तातडीने मार्गी लावण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश
पुणे : लोकवार्ता टाइम्स
‘माण-हिंजवडी ते शिवाजीनगर’ मेट्रो मार्गिका-३ प्रकल्प तातडीने मार्गी लावण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे आणि सामान्य नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले. विभागीय आयुक्त कार्यालयात माण- हिंजवडी ते शिवाजीनगरच्या मेट्रो मार्गिका-3 च्या कामासाठी कराव्या लागणाऱ्या वाहतूक नियोजनाचा उपमुख्यमंत्री पवार यांनी आढावा घेतला. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, जि.प.अध्यक्षा निर्मला पानसरे, महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार दिलीप मोहीते, आमदार ॲड. अशोक पवार, आमदार सुनिल टिंगरे, आमदार सिध्दार्थ शिरोळे, तसेच विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, सार्वजनिक-खासगी सहभाग असलेल्या या मेट्रो मार्गिकेचे काम गतीने पूर्ण करण्याचे नियोजन आहे. हा प्रकल्प यशस्वीपणे मार्गी लावण्यासाठी तसेच या संबंधीच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रकल्पाच्या संबंधित सर्व यंत्रणांचा प्रत्येक आठवड्याला आपण आढावा घेणार असून पुणे शहराच्या सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी हा प्रकल्प महत्वपूर्ण ठरणार आहे. मेट्रो मार्गिकेच्या कामात कोणत्याही प्रकारचा खंड पडणार नाही तसेच काम सुरू असताना कुठेही अपघात होणार नाही, याबाबत दक्षता घेण्यात यावी. मेट्रो मार्गिकेचे काम सुरू करण्यापुर्वी करण्यात आलेल्या वाहतूक आराखड्याबाबत सबंधित विभागाने अमंलबजावणीचे नियोजन गतीने पूर्ण करावे, कोणत्याही परिस्थितीत नागरिकांना वाहतुकीबाबत अडचण येणार नाही असे नियोजन करावे. नियोजन करताना लोकप्रतिनिधींच्या सूचना लक्षात घ्याव्यात. भुयारी मार्ग ते भुजबळ चौकादरम्यान सर्व्हीस रस्ता दुरुस्तीचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने त्वरीत पूर्ण करावे. भूमकर चौकातून कस्तुरी चौकात जाणाऱ्या रस्त्यांचे रुंदीकरण पिंपरी चिंचवड महापालिकेने लवकर करावे. विप्रो सर्कल जवळील ग्लोबल होम्स सॉव्हरियन रस्ता ते प्राईड रस्यािंचे काम करण्यासाठी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश त्यांनी दिले.
पीएमआरडीचे आयुक्त सुहास दिवसे यांनी ‘माण-हिंजवडी ते शिवाजीनगर’ मेट्रो मार्गिका-3 कामाबाबत तसेच वाहतुक व्यवस्थेच्या आराखड्याबाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली. मेट्रोच्या मार्गिकेसाठी आवश्यक असणाऱ्या जागांचे संपादन ‘भू-संपादन व पुनर्वसन कायदा २०१३’चा अवलंब करण्यात आला आहे. मेट्रो कार डेपो, राईट ऑफ वे आणि स्टेशनसाठी लागणारी सुमारे ९८ टक्के जमीन प्राधिकरणाने संपादित केली आहे. प्रकल्पाच्या अनुषंगाने आवश्यक त्या सर्व परवानग्या व लायसन्स प्राप्त करून घेण्यात आले आहेत. प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याआधीच इतके भू-संपादन व विहित सर्व परवानग्या प्राप्त करणारा हा देशातला पहिला प्रकल्प आहे. या मेट्रो मार्गिकेची लांबी २३.२ किलोमीटर असून या मार्गिकेत २३ स्टेशन्स प्रस्तावित आहेत.
केंद्र सरकारच्या ‘मेट्रो रेल धोरण २०१७’ अन्वये सार्वजनिक खाजगी भागीदारी (पीपीपी) तत्वावर राबविण्यात येत असलेला हा भारतातला पहिलाच प्रकल्प आहे. त्यासाठी केंद्र सरकारच्याबरोबरच राज्य सरकारचे २० टक्क्यांपर्यंत अर्थसहाय्य लाभणार आहे. पुणे शहरातील पुणे विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडीचे दीर्घकालीन निराकरण करण्यासाठी प्रस्तावित एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचे डिझाईन तयार करण्यात आले आहे. प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम सुरु करणेसाठी वाहतूक वळविण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. बैठकीला पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त राजेश पाटील, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, पीएमआरडीचे आयुक्त सुहास दिवसे, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण यांच्यासह मेट्रो तसेच एमआयडीसी व सबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
रिपोर्टर