Breaking News
बेरोजगार तरुणांना रेल्वेत नोकरी मिळवून देतो असे सांगून गंडा घालणाऱ्या टोळीच्या लोहमार्ग पोलिसांनी आवळल्या मुसक्या
मुंबई : लोकवार्ता टाइम्स
गरजू बेरोजगार तरुणांना रेल्वे प्रशासनामध्ये शंभर टक्के नोकरी मिळवून देतो, असे आमिष दाखवून गंडा घालणाऱ्या तीन जणांच्या टोळीला सीएसएमटी लोहमार्ग पोलिसांनी मध्य रेल्वे सीएसएमटी येथील मेन लाईन येथून मोठया शिताफीने अटक केली आहे. यामध्ये स्वप्निल उर्फ जनार्दन कांबळे राहणार कल्याण, समीर गोरे राहणार डोंबिवली आणि मोईन अहमद शेख राहणार मुंब्रा अशी या अटक आरोपींची नावे आहेत. आतापर्यंत या आरोपींच्या विरोधात १९ बेरोजगार गरजू नागरिकांनी तक्रार नोंदवली आहे. अशी माहिती सीएसएमटी लोहमार्ग वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रविण भगत यांनी दिली असून या आरोपींना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले.
नोकरीच्या शोधात असलेल्या बेरोजगार तरुणांना घेरून त्यांना रेल्वे प्रशासनात शंभर टक्के नोकरी मिळवून देतो असे आरोपी समीर गोरे पटवून सांगायचा. माझ्या ओळखीतले मुख्य अधिकारी विभागीय रेल्वे व्यवस्थापक मध्य रेल्वे सीएसएमटी येथे बसतात असे सांगून आरोपी स्वप्नील उर्फ जनार्दन कांबळे यांची भेट घालून द्यायचे आणि बेरोजगार तरुण यांच्या भूलभुलयाला फसले की आरोपी पैशांची मागणी करून आधी पैसे द्या मग वैद्यकीय प्रमाणपत्र व नंतर नियुक्ती पत्र देतो असे सांगायचे. नोकरीच्या आमिषापोटी तरुणांनी पैसे दिले की आरोपी मोईन अहमद शेख हे खोटे वैद्यकीय प्रमाणपत्र आणि नियुक्तीपत्र देण्याचे काम करत होते.
याबाबत लोहमार्ग पोलिसांना गुप्त सुत्रधारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन रेल्वे पोलीस आयुक्त केसर खालिद, पोलीस उपायुक्त एम. मकानदार यांच्या मार्गदर्शनाखाली सीएसएमटी लोहमार्ग वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रविण भगत यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनिल होलार, पोलीस उपनिरीक्षक अनिल पाडेकर यांनी पोलीस पथक तयार करून पोलीस हवालदार सुनील देसले, महेश चव्हाण, अतुल काकड, विकास नलगे, श्रीकांत इंगवले, गणेश टकले, विजय पाटील यांनी आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली आणि मोठ्या शिताफीने या तिन्ही आरोपींना मध्य रेल्वे सीएसएमटी येथील मेन लाईन येथून अटक करण्यात आले आहे. यांच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता त्यांच्याकडून खोटे नियुक्ती पत्र, वैद्यकीय प्रमाणपत्र, रेल्वेचे खोटे शिक्के जप्त करण्यात आले आहेत.
तसेच आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी या गुन्ह्यात सामील असल्याची माहिती समोर आली असून अजून रेल्वेचे मोठे मासे हाती लागण्याची शक्यता रेल्वे पोलिसांनी वर्तवली आहे. तर आरोपींना अटक केल्यानंतर या आरोपींविरोधात सीएसएमटी लोहमार्ग पोलीस ठाण्यात १९ तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत. यात आपणही या रेल्वे नोकरीच्या आमिषाला बळी पडला असला तर सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रविण भगत यांनी केले असून अधिक तपास सुरू आहे.
--------------------
रिपोर्टर