Breaking News
अनाथांच्या माय सिंधुताई सपकाळ यांचे पुण्यात निधन
पुणे : लोकवार्ता टाइम्स
अनाथांसाठी सेवाकार्य करणाऱ्या भारतीय सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांंचे आज वयाच्या ७३ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मंगळवारी रात्री ८ वाजून १० मिनिटांनी निधन झाले. पुण्यातील गॅलक्झी हॉस्पिटल याठिकाणी त्यांचे निधन झाले, महिना भरापूर्वी त्यांचे हर्नियाचे ऑपरेशन झाले होते. त्यांनंतर त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज अखेर हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
त्यांनी अनेक खडतर प्रसंगाना तोंड देत देत हजारों अनाथ मुलांचा सांभाळ केला आहे. त्यांना २०१२ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार मिळाला होता तर २०२१ साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होते.
मुळच्याच बुद्धिमान असल्या तरी जेमतेम त्यांना मराठी शाळेत चौथीपर्यंत शिकता आलं. वयाच्या नवव्या वर्षी त्यांचे लग्न झालं होतं. त्यांच्या आयुष्यातील संघर्षाने त्यांना समाजसेवेकडे वळवलं. अनाथ मुलांना सांभाळून त्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी सिंधुताई यांनी ममता बाल सदन संस्थेची स्थापना केली होती. १९९४ साली पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात ही संस्था सुरु झाली. आपली कन्या ममता हिला दगडूशेठ हलवाई संस्थेच्या माध्यमातून शिक्षणासाठी सेवासदन येथे दाखल केले आणि त्यांनी इतर अनाथ आणि बेवारस मुलांना आधार दिला. येथे लहान मुलांना सर्व शिक्षण दिले जाते. त्यांच्या भोजन, कपडे अन्य सुविधा यांची उपलब्धता संस्थेकडून केली जाते. शिक्षण पूर्ण झाल्यावर येथील मुले आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होतील यासाठीही त्यांना मार्गदर्शन दिले जाते. आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण झाल्यावर या युवक युवतींना योग्य जोडीदार शोधून देणे आणि त्यांच्या विवाहाचे आयोजन करणे हे कार्यही संस्थेकडूनच केले जाते. अशी सुमारे १०५० मुले या संस्थेत राहिलेली आहेत.
हजारो अनाथांची माय हरपली !
सिंधुताई सपकाळ यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची श्रद्धांजली
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या अकस्मित निधनाने हजारो अनाथांची माय काळाच्या पडद्याआड गेली आहे. हजारो अनाथांच्या डोक्यावरील मातृछत्र हरपले असून ती पुन्हा अनाथ झाली आहेत, अशा शब्दांत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केल्या आहेत.
सिंधुताई सपकाळ यांच्या निधनावर दु:ख व्यक्त करताना नाना पटोले म्हणाले की, हजारो अनाथांची माय असणा-या सिंधुताई सपकाळ यांचे संपूर्ण आयुष्य अत्यंत खडतर होते. अनेक कठिण प्रसंगांना सामोरे जात संघर्ष करत त्यांनी हजारो अनाथांना मातृछत्र दिले. अडचणी आणि अडथळ्यांचा सामना करत अनाथ मुलांचा आपल्या पोटच्या लेकरांप्रमाणे त्यांनी सांभाळ केला. त्यांच्या या महान कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र सरकारने त्यांना अहिल्याबाई होळकर आणि सावित्रीबाई फुले पुरस्कार देऊन तर भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. सिधुंताईच्या अकस्मित निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्रात कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे. सिंधुताई सपकाळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून काँग्रेस पक्ष त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे असे नाना पटोले म्हणाले.
रिपोर्टर