Breaking News
महाबळेश्वरच्या चतुरबेटच्या गावक-यांना वनवासी जनकल्याण समितीचा मदतीचा हात
- ढगफुटीमुळे गावक-यांचे हाल
मुंबई : लोकवार्ता टाइम्स टीम
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील चतुरबेट या गावात आणि परिसरात काही दिवसांपूर्वी झालेल्या ढगफुटीमुळे खूप मोठे नुकसान झाले. या गावातील जनतेला मुंबईतील जोगेश्वरीच्या वनवासी जनकल्याण समितीने मदतीचा हात दिला असून त्यांना जिवनावश्यक वस्तूंचे वाटप करत त्यांचे अश्रू पुसण्याचा आणि धीर देण्याचा प्रयत्न केला.
काही दिवसांपूर्वी चतुरबेट गावात ढगफुटी झाल्यामुळे तेथील रस्ते आणि डोंगर कोसळल्यामुळे तेथील सर्वसामान्य नागरिकांचे अतोनात हाल झाले. पुरामुळे गावात जाणारा साकव पूर्णपणे वाहुन गेल्यामुळे गावक-यांपर्यंत जिवनावश्यक वस्तू पोहचत नव्हत्या, सुखसमृद्धी नटलेले गाव अचानक आलेल्या आपत्तीमुळे डोळ्यात अश्रू घेऊन कोणीतरी मदत करेल याची वाट पाहत होते. त्या गावातील मुंबईमध्ये राहाणारे नरेंद्र जाधव यांनी जोगेश्वरीच्या वनवासी जनकल्याण समितीला गावाची परिस्थितीची माहिती सांगितली आणि फक्त जिवनावश्यक वस्तूंची आवश्यकता असल्याचे सांगितले. यानुसार समिती, नागरिक, राजकीय पक्ष, कंपनीतील सहकारी आणि मित्रमंडळी यांनी जिवनावश्यक वस्तूंची मदत केली. ही मदत गावामध्ये जाऊन त्यांच्या पोहचवण्याचे काम समितीतील समितीचे पदाधिकारी विनोद कोरगांवकर, प्रफुल्ल सामंत, मिलिंद सावंत, प्रमोद मेहता, उदय देवरुखकर, कुणाल पावसकर, रुपेश पावसकर, संदीप वरणकर, अमित मांडे, नित्यानंद शेट्टी, शुभम मिश्रा यांनी अथक परिश्रम घेऊन केले.
अत्यंत बिकट परिस्थितीत वाट काढत आम्ही त्या गावी पोहचलो. परंतु त्या गावी पूरामुळे साकव पूर्णपणे वाहुन गेल्यामुळे आम्हाला जमा झालेले सर्व साहित्य टेप्पो मधुन उतरून ते बोटीने घेऊन जावे लागते. अत्यंत खडतर प्रवासाने त्या गावी पोहचलो. तेथील ग्रामस्थ आमची सकाळपासूनच वाट पाहत उभे होते. गावी पोहचल्यानंतर तेथील पूरग्रस्त भागाची पाहाणी केल्यानंतर आमच्या ही डोळ्यात अश्रू उभे राहिले होते. परिस्थिती किती भयावह होती यांचा आम्ही अंदाज देखील बांधू शकत नव्हतो, असे समितीचे प्रमोद मेहता यांनी 'लोकवार्ता टाइम्स'ला सांगितले.
रिपोर्टर